ठाणे : केंद्र सरकारने ५०० आणि एक हजाराच्या नोटा बंद केल्याचा परिणाम सलग अकराव्या दिवशीही ठाण्याच्या अनेक बँकांमध्ये कायम असल्याचे दिसून आले. त्यातच, जुन्या नोटा बदलण्याची साडेचार हजारांची मर्यादा २ हजारांवर आणल्याने नागरिकांच्या रोषाला अनेक ठिकाणी पारावारच उरला नव्हता. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ठिकाणी त्या उघडण्याच्या आधीपासूनच म्हणजे सकाळी ७ वाजल्यापासूनच सर्वसामान्यांनी रांगा लावल्याचे चित्र होते. परंतु, दुसरीकडे को. आॅपरेटीव्ह बँकांच्या ठिकाणी मात्र काही मिनिटांतच नागरिकांना जुन्या नोटा बदलून मिळत होत्या. दुपारपर्यंत अनेक बँकांचे एटीएमच सुरू नसल्यानेदेखील नागरिकांच्या हालात आणखी भर पडली.केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आज अकराव्या दिवशीही अनेक बँकांत लांबचलांब रांगा लागल्या होत्या. स्टेशन परिसर, नौपाडा, जांभळी अगदी घोडबंदरच्या अनेक ठिकाणी नागरिकांनी पैसे बदलून घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. परंतु, सरकारने आता बँकेतून एका वेळी केवळ २ हजार रुपये बदलून मिळतील, असे जाहीर केल्याने नागरिकांचा राग अनावर झाला होता. छोट्या को-आॅपरेटीव्ह बँकांत मात्र काम सुरळीत सुरू असल्याचे चित्र होते. अनेक बँकांमध्ये नव्या नोटांची चणचण दिसून आली. त्यामुळे तेथील रांगा वाढत होत्या. काही बँकांनी यावर तोडगा म्हणून ज्या ग्राहकांचे खाते संबंधित बँकेत असेल, त्यांच्या मोबाइलवर नोटा उपलब्ध नसल्याचा मेसेज टाकून त्या उपलब्ध झाल्यावर आम्ही तुम्हाला कळवूच. तोपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यामुळे त्या शाखांमध्ये गर्दी कमी झाल्याचे दिसत होते. काही राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्राहकांचे उन्हात हाल होऊ नयेत, म्हणून खुर्च्या टाकून बसण्याची, काही ठिकाणी छत, तर काही ठिकाणी वृद्धांसाठी विशेष व्यवस्था केली होती. (प्रतिनिधी)- अधिक वृत्त/४, ५, ७ >रांगेतील व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्नकल्याण : बँकेच्या रांगेतील एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न तरुणाने केला खरा, पण प्रसंगावधानामुळे तो डाव फसला. किस्मत बरकत आली शेख (१९) असे चोरट्याचे नाव आहे. नोटा बदलण्यासाठी बँकेत गर्दी आहे. काटेमानिवली येथील स्टेट बँकेच्या रांगेत सत्येंद्र मिश्रा पैसे भरण्यासाठी उभे असताना शेख आणि त्याच्या साथीदारांनी आमच्याकडे एक लाख आहेत. पण या बँकेत खाते नसल्याने तुमच्या खात्यात भरा व तुमचे पैसे मला द्या, अशी गळ घातली. मिश्रा यांनी शेखकडील बंडल उघडून बघताच त्यात कागद असल्याचे आढळले. मिश्रासह अन्य व्यक्तींनी शेखला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)>शिवसैनिक झाले गायब : बँकांच्या ठिकाणी लागलेल्या रांगा पाहून शिवसेनेने एक दिवस पाण्याचे आणि बिस्किटांचे वाटप केले. परंतु, आता शिवसैनिक गायब झाले असून केवळ मतांचा जोगवा मिळवण्यासाठीच हा अट्टहास शिवसेनेने केला होता का, असा सवालही ग्राहक विचारत आहेत.
सलग अकराव्या दिवशीही नोट गोंधळ कायम
By admin | Published: November 19, 2016 3:46 AM