ऑनलाइन लोकमत,
मुंबई, दि. 11- मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. दुसऱ्या यादीअखेर २७ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केला असून अद्यापही १५ हजार ६५२ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, बहुतेक महाविद्यालयांनी अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि इन हाऊस कोट्यातील एकूण ७ हजार ६४३ जागा आॅनलाईनसाठी खुल्या (समर्पित) केल्या आहेत.अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील ७१९ महाविद्यालयांमध्ये २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी यंदा एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र त्यांपैकी केवळ १ लाख २१ हजार ८६९ इतक्या विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केले. त्यामुळे ६३ हजार १०८ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर गेले. दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र त्यांपैकी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २७ हजार ९८५ इतकी आहे. परिणामी दुसऱ्या यादीनंतर आणखी ३१ हजार ५२२ विद्यार्थी आॅनलाईन प्रक्रियेबाहेर पडले आहेत. तरी उरलेल्या १५ हजार ६५२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीनंतर प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे.सर्वांना प्रवेश मिळणारतिसऱ्या यादीत काही विद्यार्थी प्रवेशाविना राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर समुपदेशन फेरीत किंवा चौथ्या यादीत संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे अद्याप ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. आॅनलाईनसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, अशी प्रतिक्रिया मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली..........................कोट्यातील ५० हजार जागा खुल्यापहिल्या यादीअखेर महाविद्यालयांनी अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि इन हाऊस कोट्यातील एकूण ४३ हजार ४९९ जागा आॅनलाईनसाठी खुल्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या यादीतील प्रवेशानंतर अल्पसंख्यांकच्या ४ हजार ५५४, इन हाऊसच्या २ हजार ५२५ आणि व्यवस्थापन कोट्यातील ५६४ जागा मिळून एकूण ७ हजार ६४३ जागा आॅनलाईनसाठी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या यादीअखेर कोट्यातील एकूण ५१ हजार १४२ जागा आॅनलाईनच्याविद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहेत.