ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) ७० हजार विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेशाचा मेसेज मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. मात्र, केवळ नॉट रिर्पोटेड म्हणून सूचना देणारा मेसेज ७० हजार विद्यार्थ्यांना पाठवला असून, बुधवारी रिक्तजागांची माहिती देणारा मेसेज पाठवणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले.
बुधवारी मेसेज आलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवार व गुरुवार या दोन दिवसांच्या कालावधीत, संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा सल्ला, सहायक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, ह्यज्या महाविद्यालयांत जागा असतील, त्याच महाविद्यालयांतील नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्यात येतील. ज्याविद्यार्थ्यांना रिक्त जागेचा मेसेज येईल, त्यांनी त्या-त्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. इतर विद्यार्थ्यांनी ८आॅगस्टनंतर पुन्हा एकदा आॅनलाइन प्रवेशाचा अर्ज भरायचा आहे, त्यांनी ९ ते १३ आॅगस्टदरम्यान आणखी एक संधी दिली जाईल.
रिक्त जागांची आकडेवारी एक लाखाहून अधिक आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील, असेही अहिरे यांनी सांगितले. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना हा मेसेज येणार नाही. त्यांनी ३० जुलै ते २ आॅगस्टदरम्यान जुन्याच लॉगीन आयडीवर अपूर्ण अर्ज पूर्ण भरायचा आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या माहिती पुस्तिकेमधील मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अधिक माहिती घ्यावी, याउलट दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ९ आॅगस्टपासून विशेष फेरी आयोजित केली आहे. या फेरीत सर्वच विद्यार्थ्यांना शेवटची संधी दिली जाईल. परिणामी, विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहिती भरून आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.