मुंबई : अकरावीच्या आॅनलाइन नोंदणीत अर्धवट अर्ज भरलेल्या आणि प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी, ४ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीआधी एकूण ८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी १ व २ आॅगस्ट रोजी आॅनलाइन अर्ज केले होते.याआधी जाहीर झालेल्या चार कट आॅफमधील दुसऱ्या कट आॅफच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार ही गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. गुणवत्ता यादीत ज्या महाविद्यालयाचे नाव येईल, त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५ व ६ आॅगस्ट रोजी प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. दुसऱ्या कट आॅफहून कमी गुण मिळालेले आहेत, त्यांना शुक्रवारी ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या विशेष फेरीच्या नोंदणी प्रक्रियेत सामील होता येईल. एकूण १ लाख २३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केलेला आहे. अर्ज केलेल्या ८ हजार २४३ विद्यार्थ्यांमधील बहुतेक विद्यार्थ्यांची भर पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)>आणखी एक संधी मिळणारज्या विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत जाहीर होणार नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक कारणास्तव प्रवेश निश्चित करता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे. त्यांना ५ व ६ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे. अद्यापही मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेशासाठी ९० हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले.
अकरावीची गुणवत्ता यादी आज
By admin | Published: August 04, 2016 4:49 AM