मुंबई - गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे बीडमधील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला मुंडे समर्थक कार्यकर्ते आणि नेते हजर राहणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे यांनी लोकांना आवाहन केलं होतं. त्यात पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? या वाक्यांमुळे पंकजा मुंडे भाजपात नाराज असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली.
आज होणाऱ्या मेळाव्यात नेमकं पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळासोबतच अनेक कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. या मेळाव्यातून पंकजा मुंडे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे ओबीसी समाजाची मूठ बांधून नव्या संघटनेची घोषणा करणार? मतदारसंघात पराभव झाला असला तरीही आजच्या शक्तीप्रदर्शानातून पंकजा मुंडे भाजपाला अप्रत्यक्षपणे मला पक्षात डावलता येणार नाही असा संकेत देणार? की पंकजा मुंडे भाजपाशी फारकत घेणार? या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केल्यानंतर अनेकांनी पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आपण भाजपातच आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यास वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क केला असता ‘काही वेळ वाट पहा, मेळाव्यातच भूमिका स्पष्ट करेन’, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव घडवून आणण्यात आला, असा स्पष्ट आरोप एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. आपण आरोपांचे पुरावे देऊ असं म्हणत त्यांनी थेट माजी मंत्री गिरीश महाजन यांनादेखील आव्हान दिलं होतं. या संपूर्ण आरोप प्रत्यारोपांवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी अतिशय सूचक विधानं करत पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वावर टीका केली.
यशामध्ये भागीदार होता, तर पराभवाचीदेखील जबाबदारी घ्यायला हवी. आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला हवा,विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात माझा पराभव झाला. मात्र हा पराभव मी केवळ पाच मिनिटांमध्ये स्वीकारला. मी दिग्गज नेत्यांना पाहात लहानाची मोठी झाले आहे. त्यामुळे मी लगेच पराभव पचवू शकले असं त्यांनी सांगितले. तसेच जर आम्ही राष्ट्रवादीसोबत जात असू, तर त्या तिघांची महाआघाडी चुकीची आहे, असे म्हणणं योग्य नाही. ते तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असतील तर ते अयोग्य असं मला वाटत नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीचं समर्थन केलं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलतील हे काही वेळात स्पष्ट होईल.