पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या तपासाबाबत शंका उपस्थित केली होती. हे तपास प्रकरण बनावट असून त्याविषयीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पवार यांनी लिहिले होते. तसेच एसआयटीमार्फत एल्गार प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी देखील केली होती. मात्र त्याचवेळी केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले. आता पवारांनी त्यांच्याकडील महत्वाची कागदपत्रे सार्वजनिक करून केंद्र सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, अशी विनंती वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता गेली व महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हे सर्व तपास प्रकरण बनावट असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या पत्रात एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आता प्रकाश आंबेडकर यांनी पवारांना एल्गार परिषदेसंबंधी त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची विनंती केली आहे. शरद पवार ही विनंती मान्य करतील अशी अपेक्षा देखील आंबेेेडकरांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु केले आहे. तसेच एल्गार परिषदेवरून केंद्र सरकार राजकारण असून या प्रकरणाचा तपास देखील चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित व्यक्तींवर नको असलेले कायदे लावण्यात आले आहे. मात्र या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल.