मुंबई : पोलीस निरीक्षक पदांपर्यंतच्या बदल्याचे अधिकार जिल्हास्तरावरील जिल्हा पोलीस आस्थापना मंडळास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र या निर्णयाला काही मंत्र्यांनी विरोध केला. पोलिसांच्या बदल्यांचे अधिकार जर आपल्याकडे नसतील तर पोलीस आम्हाला जुमानणार नाहीत, अशी तक्रार मंत्र्यांनी केली. त्यावर बदल्यांबाबत अंतिम अधिकार गृहमंत्री व मुख्यमंत्री या नात्याने आपल्याला आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यावर विरोधी भूमिका घेणारे मंत्री शांत झाले.महाराष्ट्र पोलीस अधिनियमात महत्त्वाच्या सुधारणा करून बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागील सरकारने या बाबतचे विधेयक विधिमंडळात मंजूर करुन घेतले होते. पोलीस अधिनियमातील सुधारणांमुळे जिल्हा स्तरासह राज्य पोलीस दलातील विशेष यंत्रणांच्या स्तरावर पोलीस आस्थापना मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे त्या स्तरावरील बदल्याचे अधिकार देण्यात येतील. महसूलमंत्री एकनाथ खडसे व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पोलिसांच्या बदल्यांचे अधिकार सरकारला नसतील तर पोलीस आपल्याला जुमानणार नाहीत, असा सूर लावला होता.जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली असेल. तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) हे या मंडळाचे सदस्य असतील. विशेष यंत्रणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळावर संबंधित यंत्रणेचे प्रमुख हे अध्यक्ष असतील, तर या विशेष यंत्रणेतील तीन ज्येष्ठ अधिकारी सदस्य असतील.पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या सर्वसाधारण तसेच मुदतपूर्व बदल्यांचे अधिकार या पोलीस आस्थापना मंडळांना असतील. त्याचप्रमाणे संबंधित जिल्हा किंवा विशेष पोलीस यंत्रणेच्या बाहेर पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्या करण्याची शिफारस पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक -२ ला करण्याचे अधिकारही या आस्थापना मंडळांना आहेत. राज्य पोलीस दलामध्ये एका वर्षात करावयाच्या बदल्यांचे प्रमाण कार्यरत पदांच्या कमाल एक तृतीयांशपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)च्महसूलमंत्री एकनाथ खडसे व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पोलिसांच्या बदल्यांचे अधिकार सरकारला नसतील तर पोलीस आपल्याला जुमानणार नाहीत, असा सूर लावला होता.
बदली अधिकारावरून मंत्री नाराज !
By admin | Published: January 21, 2015 1:53 AM