संदीप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने ‘महानंद’मधील शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या चौकशीची घोषणा केल्यानंतर या घोटाळ्याचे खापर परस्परांवर फोडण्याच्या अहमहमिकेतून ‘महानंद’च्या चेअरमन वैशाली नागवडे आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यांनी परस्परांसोबत काम करणे अशक्य असल्याचे पत्र सरकारला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर छुपी युती असलेले राज्यातील भाजपाचे सरकार ‘महानंद’मधील भ्रष्टाचारावर कारवाईचा आसूड ओढणार किंवा कसे याबाबत प्रशासनात मात्र संभ्रम आहे. ‘महानंद’मधील भ्रष्टाचार, पैशाची उधळपट्टी, दूध संकलनातील घट हे वर्षानुवर्षांचे जुने दुखणे आहे. राज्यात सहकार क्षेत्रावर वरचष्मा असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना या घोटाळ््यांवर पांघरूण घातले गेले. मात्र भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘महानंद’मधील घोटाळ््याची चौकशी करण्याची घोषणा केली. आता सर्व गैरव्यवहार, गैरव्यवस्थापन याचे खापर संचालक मंडळ प्रशासनावर फोडू पाहत आहे तर प्रशासन संचालकांना त्याकरिता जबाबदार धरू पाहत आहे.याच संघर्षाचे पडसाद संचालक मंडळाच्या बैठकीत उमटले. मत्स्योद्योग विकास मंडळाचा कार्यभार असलेले महानंदचे व्यवस्थापकी संचालक विश्वास पाटील तसेच वित्त सल्लागार संध्या पवार यांना चेअरमन वैशाली नागवडे व संचालकांनी लक्ष्य केले. पाटील यांनी सूत्रे हातात घेतली तेव्हापासून महानंदची दूध विक्री ३० हजार लि.ने घटल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांना जाब विचारण्यास व हेत्वारोप करण्यास प्रारंभ केल्याचे पाटील यांनी सचिवांना केलेल्या तक्रारीत नमूद केले. यामुळे पाटील यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांना पाचारण करावे लागले. पाटील यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. आता पाटील यांना दूर करून महानंदला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक देण्याची मागणी संचालक मंडळाने केली आहे तर खुद्द पाटील यांनीही या संचालकांसोबत काम करण्यास तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
‘महानंद’मधील प्रशासकीय संघर्षाला उकळी
By admin | Published: May 04, 2015 1:40 AM