राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी
By दीपक भातुसे | Published: October 18, 2024 07:30 AM2024-10-18T07:30:20+5:302024-10-18T07:31:17+5:30
...मात्र, हे प्रयत्न करताना थेट अजित पवारांची साथ न सोडता आधी शरद पवारांकडून उमेदवारी मिळेल का, याची चाचपणी हे आमदार करत असल्याचे चित्र आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर गेलेले काही आमदार शरद पवारांकडे परतण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, हे प्रयत्न करताना थेट अजित पवारांची साथ न सोडता आधी शरद पवारांकडून उमेदवारी मिळेल का, याची चाचपणी हे आमदार करत असल्याचे चित्र आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर त्यांच्याबरोबर ४० आमदार गेले होते. त्यातील नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश करून नगरमधून लोकसभा निवडणूक लढवत ती जिंकलीही. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागा लढवत ८ जागा जिंकल्या, तर दुसरीकडे अजित पवार गटाने ४ जागा लढवल्या आणि केवळ १ जागा जिंकली. विधानसभा निवडणुकीतही आपण शरद पवारांच्या विरोधात लढलो तर लढाई अवघड होईल, असा अंदाज ज्या आमदारांना आहे, ते शरद पवारांकडे परत जाण्याची चाचपणी करत आहेत.
रामराजेंचे निकटवर्तीय शरद पवारांसोबत, माढ्यातही धक्का
आतापर्यंत अजित पवार गटातील फलटणचे आमदार आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांचे निकटवर्तीय दीपक चव्हाण यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, रामराजे निंबाळकर हे मात्र अजित पवार गटात कायम आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ते ‘मविआ’च्या उमेदवाराला मदत करतील, अशी शक्यता आहे.
शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवारांची साथ सोडली. मात्र, शरद पवारांकडून त्यांना उमेदवारीबाबत अद्याप शब्द देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्यातरी अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अस्वस्थता
- शरद पवारांची सर्वात जास्त ताकद पश्चिम महाराष्ट्रात आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवारांनी या भागावर विशेष लक्ष दिले आहे.
- त्यामुळेच अजित पवार गटातील या भागातील आमदारांमध्ये जास्त अस्वस्थता असल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागातीलच अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे समजते.
राजेंद्र शिंगणे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
अजित पवारांची साथ सोडण्यापूर्वी शरद पवारांकडून तिकीट मिळेल का, यासाठी काही आमदारांनी चाचपणी सुरू केली आहे. यात सिंदखेडराजा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी तीन दिवसांपूर्वी गुपचूप शरद पवारांची भेट घेतली. मात्र, त्यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. शिंगणेंनी भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून त्यांना आम्ही कसा निधी दिला, याचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. तरीही शरद पवारांकडून तिकिटाचा शब्द मिळाला तर ते अजित पवारांची साथ सोडायला तयार असल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते.
आमदार अतुल बेनकेंचे बंधू शरद पवारांच्या भेटीला
- पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बनेकेही सध्या दोन दगडांवर पाय ठेवून आहेत. त्यांचे बंधू अमोल बेनके यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मिळेल का, याचीच चाचपणी केली आहे.
- नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेबाबतही संशय घेतला जात आहे. झिरवाळ आपण अजित पवारांबरोबर असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी नुकतीच पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे.