पुणे : रिक्षा वगळून प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘लोकेशन ट्रॅकिंग उपकरण’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही उपकरणे नसल्यास नवीन वाहनांची नोंदणी केली जाणार नाही, असे प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. वाहनांमधील प्रवासी प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने केंद्रीय परिवहन विभागाने प्रवासी वाहनांमध्ये ‘लोकेशन ट्रॅकिंग उपकरण’ व आपत्कालीन बटन बसविण्याबाबत नोव्हेंबर २०१६ मध्ये अधिसुचना काढलली होती. या अधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५ मध्ये या उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जानेवारी २०१९ पासून केली जाणार असल्याचे शासनाकडून त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व वाहन उत्पादक, विक्रेत्यांना याबाबत सुचित करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवार (दि. १) पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.दुचाकी, ई-रिक्षा, रिक्षा तसेच इतर तीनचाकी वाहने आणि ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळुन सर्व नव्याने नोंदणी होणाºया सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये ही उपकरणे बसविणे आवश्यक आहे. नवीन टॅक्सी, बस, मिनी बस, स्कुल बस व इतर प्रवासी वाहनांचा त्यामध्ये समावेश आहे. ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांची नोंदणी होणार नसल्याचे आजरी यांनी स्पष्ट केले. -------------नियंत्रण कक्षच अस्तित्वात नाही प्रवासी वाहनांमध्ये आपत्त्कालीन बटन व ट्रॅकिंग उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले असले तरी अद्याप नियंत्रण कक्षच स्थापन करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंगळवारपासून आपत्कालीन बटन असलेली वाहने रस्त्यावर आली तरी त्यावर कुणाचेच नियंत्रण राहणार नसल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने केंद्र सरकारकडून विविध पातळ््यांवर प्रयत्न केले जात आहेत. वाहनांच्या नंबर प्लेटपासून वाहनांमध्ये आपत्कालीन बटन बसविणे, चाईल्ड लॉकची सुविधा नसणे असे विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यापैकी आपत्कालीन बटन व लोकेशन ट्रॅकिंग उपकरणे बसविणे मंगळवार (दि. १) पासून बंधनकारक करण्यात आले आहे. रिक्षा व इतर तीन चाकी वाहने वगळून परवाना आवश्यक असलेल्या वाहनांमध्ये ही उपकरणे असल्याशिवाय नोंदणी होणार नाही. पण हे बंधन घालताना शासन या उपकरणांचे नियंत्रण कुणाकडे असेल, याबाबतचा निर्णय घेणे विसल्याचे दिसते.प्रादेशिक परिवहन विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहनांमधून महिला प्रवास करताना काही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्यास आपत्कालीन बटन दावू शकते. हे बटन दाबल्यानंतर ते नियंत्रण कक्षाला लगेच कळणार आहे. कक्षाकडे लगेचच वाहनाची सर्व माहिती तसेच त्याचे सध्याचे ठिकाण समजेल. त्यानुसार स्थानिक पोलिसांना ही माहिती दिली जाईल. त्यानंतर पोलिसांना संबंधित वाहन पकडणे, अडचणी सापडलेल्या महिलांना वाचविणे सहज शक्य होणार आहे. पण या उपकरणांचे नियंत्रण कुणाकडे असेल, नियंत्रण कक्ष कुठे असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाकडून एकत्रितपणे हा नियंत्रण कक्ष उभारला जाऊ शकतो. तसेच स्थानिक किंवा राज्य पातळीवरही कक्ष असू शकतो. पण अद्याप याबाबत शासनाकडून काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
आपत्कालीन बटन व ट्रॅकिंग उपकरण प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना उद्यापासून बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 8:52 PM
रिक्षा वगळून प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘लोकेशन ट्रॅकिंग उपकरण’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ठळक मुद्देअधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५ मध्ये या उपकरणांचा समावेशनवीन टॅक्सी, बस, मिनी बस, स्कुल बस व इतर प्रवासी वाहनांचा त्यामध्ये समावेश नियंत्रण कक्षच अस्तित्वात नाहीपोलिसांना संबंधित वाहन पकडणे, अडचणीत सापडलेल्या महिलांना वाचविणे सहज शक्य होणार