अकोेला : मान्सूनचे यंदा वेळेवर आगमन होईल, पण ९३ टक्केच बरसणार असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे. परंतु राज्यात विभागवार या पावसाचे स्वरू प कसे असेल, हे अद्याप स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती मिळावी आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कृषी विभागाने आपत्कालीन पीक नियोजनावर भर देण्याचे ठरवले आहे. याकरिता १३ मे रोजी पुण्यात राज्याचे आपत्कालीन पीक नियोजन ठरवले जाणार आहे. मागील वर्षी राज्यात १२ टक्के पाऊस कमी झाला होता. याची सर्वाधिक झळ विदर्भ, मराठवाड्याला बसली. धान, कापूस, सोयाबीन हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. खरीप हंगामातील सर्वच पिकांंचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांची ७,२४१ गावातील पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली. हा अनुभव बघता, यंदा असे काही झाले तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोेंड देण्यासाठी कृषी विभाग यंत्रणा सज्ज ठेवणार आहे.पावसाळा एक आठवडा लांबला, तर शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावी आणि दोन-तीन आठवडे पावसाने दांडी मारली, तर नेमके कोेणत्या पिकांची पेरणी करावी, याबाबत नियोजन केले जाणार असून संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी त्यासाठीच्या नेमक्या उपाययोजनावर भर दिला जाईल. यासाठी पुणे येथे कृषी विभागाचे अतिरिक्त मुुख्य सचिव, राज्याचे कृषी आयुक्त एका कार्यशाळेच्या माध्यमातून पीक नियोजनाचा आढावा घेतील. (प्रतिनिधी)
आपत्कालीन पीक नियोजन उद्या ठरणार !
By admin | Published: May 12, 2015 1:04 AM