ऑनलाइन लोकमत/गोरख माझिरे
भुगाव, दि. 19 - महामार्गावर तसेच दुर्गम ठिकाणी अपघात घडल्यास तातडीची मदत न मिळाल्याने अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. भारतात अशा घटनांची संख्या जास्त आहे. अशाच एका घटनेत आपल्या भावाला गमावलेल्या एका बहिणीने अशी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी ‘फार्इंड नीअरबाय प्लेस’ अॅप तयार करून भावाला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. या अॅपद्वारे जवळच्या ठिकाणावरून तातडीने मदत मिळवणे शक्य होणार आहे.
भुगाव येथील रहिवासी नयन चौंधे असे या तरुणीचे नाव आहे. नयन हिचा भाऊ मंदार चोंधे याचा २०१३ मध्ये पंढरपूर येथे जात असताना अपघात झाला होता. त्या वेळी जवळील हॉस्पिटल सापडत नव्हते. रात्रीची वेळ असल्याने विचारण्यासाठीही कोणीही नव्हते. तेथून त्याला ३० किमी अंतरावर एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता. वेळीच उपचार मिळाले असते तर मंदार आज आपणा सर्वांसोबत असला असता. अशी वेळ कोणावर येऊ नये, म्हणून तिने हे अॅप करायचे ठरवले.
गुगल डेटाचा वापर करून तिने हे अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे आपण ज्या ठिकाणी असू त्याच्या पाच किलोमीटर परिघातील दवाखाने, हॉटेल्स, एटीएम आदी महत्त्वाची ठिकाणे, संपर्क क्रमांक तसेच त्या ठिकाणी जाण्याचा रूट मॅप असणार आहे. यामुळे तातडीची मदत मिळणे शक्य होणार आहे. हे अॅप गुगल स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते. नयन हिने मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयातून आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील सुतारवाडी येथील खासगी केबल कंपनीत काम करतात. घरात एकुलती असल्याने संपूर्ण वेळ ती घरातल्यांसाठी देणार असल्याचे तिने सांगितले. सध्या अनेक उत्कृष्ट अशा सॉफ्टवेअर, वेबसाईट ती घरीच तयार करीत आहे.
या अॅपची आदर्श ग्रामपंचायत भुगाव यांनी दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दगडूकाका करंजावणे, विद्यमान सरपंच सचिनभाऊ मिरघे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, ग्रा. पं. सदस्य मधुकर गावडे, दत्तात्रय करंजावणे, युवानेते अक्षय सातपुते, प्रदीप शेडगे यांनी ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला व अॅपची प्रशंसा करून नयनचे कौतुक केले.
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन फार्इंड नीअरबाय प्लेसेसवर क्लिक केल्यास हे अॅप मोफत मिळते. त्यासाठी जीपीएस यंत्रणा चालू करावी लागते. जगाच्या कोणत्याही कानाकोपºयात गेलात तरी जवळपासचे हॉस्पिटल, पोलीस ठाणे, पेट्रोल पंप, बँका, एटीएम, बगीचे, चित्रपटगृहे, बसस्थानके आदी ठिकाणे नकाशाद्वारे दिसतात. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणापासूनचा जाण्याचा रस्ता, अंतर कळते. तसेच त्या ठिकाणचा पत्ता, संपर्क, वेळही कळते.
उपयुक्त अॅपची निर्मिती
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर पोलीस विभागातर्फे ‘प्रतिसाद’ अॅप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होत आहे, त्याप्रमाणेच पुणे पोलिसांचेही अॅप ती तयार करीत आहे. तसेच महाराष्ट्रातील काश्मीर अशी ओळख असणा-या मुळशी तालुक्यातील पर्यटनस्थळे लोकांसमोर आणण्यासाठी ‘मुळशी पर्यटन’ हे अॅपही तयार करण्याचा तिचा मानस आहे.
"मी भाऊ गमावला"
संटककाळात मदत न मिळाल्याने मला भावाला गमवावे लागले. इतरांवर ही वेळ येऊ नये, यासाठी उउपयुक्त असे अॅप बनविण्याचे ठरविले. यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला. याचा वापर करून संकटकाळात जवळील ठिकाणांची माहिती मिळवून मदत मिळवता येणे शक्य आहे. - नयन चोंधे, विद्यार्थिनी