ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनंतर गो-एअर कंपनीच्या विमानाचे शनिवारी नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. गो-एअरच्या जी८ २४३ या विमानाने शनिवारी सकाळी ८ वा २० मिनिटांनी भुवनेश्वरहून मुंबईला जाण्यासाठी
उड्डाण केले. मात्र काही वेळातच विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारा कॉल आल्यानंतर इमर्जन्सी लँडिंगसाठी विमान नागपूरच्या दिशेने वळवण्यात आले. सकाळी ९.३० च्या सुमारास हे विमान नागपूर विमानतळावर उतरले आणि १५० प्रवाशांना विमानातून तातडीने उतरवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर विमानतळावरील अधिकारी व बॉम्बस्क्वॉड पथकाच्या मदतीने विमानाची कसून तपासणी करण्यात आली असता विमानात बॉम्ब अथवा इतर कोणतीही घातक वस्तू आढळली नाही.
अधिका-यांकडून विमान सुरक्षित असल्याची ग्वाही मिळाल्यानंतर सर्व प्रवाशांना पुन्हा विमानात बसवण्यात आले आणि दुपारी १२ च्या सुमारास विमानाने पुन्हा मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.