राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला अटक केली. त्यानंतर या दोघांना भेटायला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. सोमय्या यांच्या हनुवटीला यात जखम झाली असून त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सोमय्यांवरील हल्ल्यावरुन भाजपा आता आक्रमक झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील गुंडगिरीच्या घटना पाहता लोकशाही धोक्यात आली आहे याचं उदाहरणच काल पाहायला मिळालं असं रावसाहेब दानवे म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"राणा दाम्प्त्याच्या मातोश्रीवर धडक देण्याच्या भूमिकेचं समर्थन करता येणार नाही. पण त्यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी केली होती. त्यात चुकीचं काय होतं? हनुमान चालीसाला इतका विरोध कशासाठी? आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हैदोस घालत होते ते पाहता विरोधकांची मुस्कटदाबी करणं हेच या सरकारचं उद्दीष्ट बनलं आहे. ही अशीच परिस्थिती आणीबाणीच्या काळात पाहायला मिळाली होती. पण जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जनताच याचं उत्तर देईल", असं रावसाहेब दानवे म्हणाले.
"ज्या राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर धडकण्याची भूमिका घेतली त्यांना पोलीस नोटीस देतात. पण त्यांच्या घराबाहेर हैदोस घालणाऱ्यांना पोलिसांनी काहीच केलं नाही. त्यांच्याविरोधात एकही तक्रार दाखल केली जात नाही. किरीट सोमय्यांच्या गाडीवर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला होतो. त्याबाबतही पोलीस तक्रार दाखल करत नाहीत. महाराष्ट्र पोलिसांनी एवढं नाव कमावलं. पण त्यांना बदनाम करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. पोलिसांना पुढे करुन राजकारण करण्याचा धंदा राज्य सरकार करत आहे", असं दानवे म्हणाले.
"राणा दाम्पत्य आणि अण्णा हजारे यांची तुलना मी करणार नाही. पण अण्णा हजारे जेव्हा काही प्रश्नांना घेऊन उपोषणाला बसतात तेव्हा सरकार त्याची दखल घेऊन सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करुन तोगडा काढतात हे आपण पाहिलं आहे. मग राणा दाम्पत्य लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांचं म्हणणं सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन जाणून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. सरकारच्या प्रतिनिधींनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असती आणि त्यांच्याशी चर्चा केली असती तर प्रकरण सोडवता आलं असतं. पण विरोधकांची केवळ मुस्कटदाबी करुन त्यांची भूमिका हाणून पाडण्याचं काम सरकार करत आहे", असंही रावसाहेब दानवे म्हणाले.