सातारा : रिक्षाचालकाच्या लेकराने स्वत:च्या जिद्दीच्या बळावर माहुलीच्या गल्लीतून थेट दिल्लीपर्यंत धडक मारली. राजपथ संचलनासाठी सुमित धारासिंग साळुंखे याची निवड झाली आहे. एलबीएस महाविद्यालयाचा हा विद्यार्थी एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्र पथकाचा कमांडर म्हणून राज्याचा बॅनर घेऊन पंतप्रधान रॅलीत सर्वांत पुढे चालणार आहे. सुमितच्या या दुहेरी यशाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा सुमित साळुंखे हा विद्यार्थी आहे. या निवडीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून विविध आठ कॅम्पमधून अत्यंत खडतर प्रशिक्षण व निवड चाचणीमधून त्याची महाराष्ट्रातील अंतिम ३४ सैनिकांमध्ये निवड झाली आहे. या शिबिरात संचलनाबरोबरच सेनायुद्ध अभ्यास, शांती काळात काम करण्याचे प्रशिक्षण, ऑबस्टॅकल ट्रेनिंग आदी खडतर ट्रेडिंग त्याने पूर्ण केले आहे. यावर्षी तो २२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा या बटालियनमधून तो ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा देत आहे.
त्याच्या या यशासाठी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एम. ठोंगे, कर्नल पराग गुप्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी मार्गदर्शन केले. एन. सी. सी. अधिकारी प्रा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सुभेदार मेजर उदय पवार, ट्रेनिंग जेसीओ दीपक शिंदे, हवलदार यशवंत पवार यांनी सुमितच्या प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
वडिलांचा अपघात झाल्याने त्यांना फौजेत जाता आले नाही. त्यांचे हे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. माझ्या आई वडिलांसह गुरूजनांनी मला घडविण्यासाठी केलेल्या कष्टामुळेच दिल्लीत मान्यवरांना मानवंदना देण्याइतपत यश मिळवू शकलो.- सुमित साळुंखे, एलबीएस, सातारा
गतवर्षी अपयश... यंदा दुहेरी यशसुमितच्या वडिलांना गतवर्षीच अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने सुमितने लॉकडाऊनच्या काळा आंबे, कांदा आदी विकून सिझनल व्यवसाय केला. वडिलांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे तणावात असलेला सुमित गतवर्षी सहाव्या फेरीतूनच बाहेर पडला तेव्हाच आपले प्रशिक्षक प्रा. डॉ. महेश गायकवाड यांना ‘सर, पुढच्या वर्षी मी या परेडमध्ये असणार’ असा शब्द दिला होता.