मुंबई : पवार कुटुंबियांमध्ये कौंटुंबीक कलह असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमधून स्पष्ट केले असताना अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अजितदादांनी स्वगृही परत येण्याचे आवाहन केले आहे.
रोहित पवार यांनी फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यात ते म्हणतात की, लहानपणापासून शरद पवार साहेबांना पाहत आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडिलांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत. तसेच अजितदादांचे वडील वारल्यानंतर त्यांनादेखील सावरणारे साहेबच होते. त्यांच्या पश्चात शरद पवारांनीच वडिलांचे प्रेम दिले. याचबरोबर साहेब अडचणीत असल्यावर खंबीर भूमिका घेत त्यांच्यासोबत अजितदादा राहत होते.
आजच्या घडामोडी पाहता ते जुने चित्र तसेच रहावे अशी इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर अजितदादांनी शरद पवारांचे सर्व निर्णय मान्य करावेत आणि स्वगृही परत यावे असे मनापासून वाटत असल्याचे रोहित म्हणाले. शरद पवार राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत आणि करणारही नाही असे स्पष्टीकरण रोहित यांनी दिले. याचबरोबर सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत. या काळात कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं, असेही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी अजितदादांना भावनिक आवाहन करताना त्य़ांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सांगताना या सगळ्या राजकारणात हक्काची माणसं दूरावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.