मुंबई - भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाने सुरू झालेल्या गोंधळाने सोमवारी टोक गाठले. विधान परिषदेत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांचा पारा चढला, अरेतुरेची भाषा झाली. तर सभापतींच्या दालनात शिवसेनेचे एक मंत्री आणि एका विधान परिषद सदस्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रकरण एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत गेले.विधिमंडळाची दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे बैठकांचे सत्र सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सर्वांना एकत्र करून वाद मिटवण्यात पुढाकार घेतला. त्यात शिवसेनेचे सदस्य आ. अनिल परब यांनी मंगळवारी परिचारक यांच्यासंबंधी ठराव मांडायचा व त्यावर सभापती निर्णय देतील, असे सांगून विधान परिषदेचे कामकाज सुरू करायचे. तर धनंजय मुंडे यांच्या कथित टेप प्रकरणाच्या चौकशीसाठी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, सभापती रामराजे निंबाळकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची संयुक्त समिती नेमून विधानसभेचे कामकाज सुरू करायचे, असे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.विधान परिषदेतील तिढा सोडविण्यासाठी सकाळी सभापतींच्या दालनात एक बैठक झाली. संसदीय कार्यमंत्र्यांसह काही मंत्री व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. शिवसेनेचे एक मंत्रीे व परिषदेच्या सदस्यामध्ये बैठकीत शाब्दिक चकमक झाली. रागाच्या भरात मंत्री त्या आमदाराच्या अंगावर धावून गेल्याचे समजते. तर विधान परिषदेत कपिल पाटील यांच्या एका टिप्पणीवरून चंद्रकांत पाटील यांचा संताप अनावर झाला. संघाबद्दल कोणी काहीही बोलले तरी तुम्ही ऐकून कसे घेता, असे खडे बोल त्यांनी काही मंत्र्यांना ऐकविल्याचे समजते.सभागृह नेत्याच्या संतापामुळे विधान परिषदेचे कामकाज तहकूब होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. महसूलमंत्र्यांची आजची भाषा असंसदीय होती. महसूलमंत्री अरेतुरेवर आले, अंगावर धावून गेले, याची बघतो, त्याची बघतो, सभागृह बंद झाल्यावर बघतो, अशी भाषा त्यांनी केली, हे लोकशाहीत कधीही घडले नव्हते.शरद पवारांबद्दल आम्ही बोललो तर तुम्हाला चालेल का, असेही ते म्हणाले. त्यावर राष्टÑवादीचे आ. सतीश चव्हाण यांनी योग्य ते उत्तर दिले, पण सभागृह नेते अंगावर धावून गेले, असेही मुंडे यांनी सांगितले. आता उद्या दोन्ही सभागृहांचे कामकाज कसे होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मंत्री-आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी, सभापतींच्या दालनातील प्रकार
By अतुल कुलकर्णी | Published: March 06, 2018 5:14 AM