मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ पासूनच्या प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी मिळाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने सरकारला दिला आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीसह महागाई भत्ता ६ टक्के मंजूर करावा, अशी मागणीही महासंघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी यांनी केली आहे.कुलकर्णी म्हणाले की, शासनाने अद्यापही पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर केलेल्या नाहीत. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असावा, रिक्त पदे तत्काळ भरावीत आणि कंत्राटी पद्धती बंद करावी, अशा इतर काही प्रमुख मागण्याही शासन दरबारी प्रलंबित आहेत.त्यामुळे शासन शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चालढकल करत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसमोर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सरकार कोणाचेही असो, भारतीय कामगार सेना महासंघाच्या पाठिशी उभी राहील, असे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी सांगितले आहे. या वेळी आमदार अजय चौधरी आणि कामगार सेनेचे चिटणीस शंकर मोरे यांनी महासंघाच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)
महागाई भत्त्याच्या थकबाकीसाठी कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 5:52 AM