मुंबई : अर्जुन श्रीहरी कचरे (४२) या कर्मचाऱ्याने तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आलेल्या तणावातून विधान भवनात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास समोर आली. मुंब्रा येथे राहणारे कचरे विधान भवनातील अग्निशमन दलाचे कर्मचारी होते. कचरे यांनी मंत्रालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारली, असे प्राथमिक तपासात आढळून आले. ते विधान भवनाच्या घुमटावर आदळून गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे. कचरे सकाळी ७ वाजता कर्तव्यावर हजर झाले. पण कचरे यांनी नेमकी कुठून उडी मारली याची माहिती कोणालाही नाही, असे पोलिसांनी सांगितले. तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कचरे तणावात होते, ही माहिती सहकाऱ्यांच्या जबाबातून समोर आली आहे. वेतन का मिळाले नव्हते याची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यांचा मोबाइल फोनही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. (प्रतिनिधी)
विधान भवनात कर्मचाऱ्याची आत्महत्या
By admin | Published: June 26, 2015 3:01 AM