नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली. आजूबाजूच्या महिलांनी धाव घेऊन ही प्रसूती सुरक्षित केली असली तरी त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील अनागोंदी उघड झाली असून, परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दवाखान्यातील अधिकाºयांची झाडाझडती घेतल्यानंतर रजेवर असलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.एखाद्या दुर्गम खेड्यापाड्यावर घडावी अशी घटना शहरात तेही पंचवटीसारख्या ठिंकाणी घडली असून, हा विषय गाजण्याची शक्यता आहे.पंचवटीत पेठरोड येथे झोपडपट्टी बहुल परिसर असून, तेथे महापालिकेचा दवाखाना व प्रसूतिगृह असून, तेथेही पुरेशा सुविधा नसल्याने ओरड होत आहे. या प्रसूतिगृहात सुविधा देऊ असे वारंवार आश्वासन महापालिका देत आहे. तथापि, प्रत्यक्षात मात्र कोणत्याही सुधारणा होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. याच परिसरात राहणार्या एका महिलेने रुग्णालयात प्रसूतीसाठी नोंदवले होते. त्यानुसार महिलेला प्रसूतिवेदना होताच येण्यास वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले होते. सोमवारी दुपारी सदरची महिला रिक्षाने प्रसूतिगृहापर्यंत आली. परंतु निरोप पाठवूनही कोणीही तिला घेण्यासाठी वा स्ट्रेचर घेऊन आले नाही. सुमारे अर्धातास प्रतीक्षा करूनही तेथे कोणी आले नाही. सर्व कर्मचारी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. सुरक्षारक्षकही गायब होता.
याप्रकारानंतर त्या महिलेस प्रसूतिकळा येऊ लागताच याच परिसरातील अन्य महिला मदतीला धावल्या आणि रिक्षातच तिची प्रसूती करण्यात आली. तिला पुत्ररत्न झाल्याचे आणि माता आणि बालक दोघेही सुरक्षित असल्याचे कळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर प्रसुतिगृहातील एक महिला कर्मचारी धावत तेथे आली त्यानंतर त्या महिलेस प्रसूतिगृहात नेण्यात आले. यावेळी परिसराचे नगरसेवक जगदीश पाटील, लोकनिर्णय संस्थेचे संतोष जाधव आणि अन्य नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रसुतिगृहातील सर्व कर्मचारी मस्टरवरील नोंदीनुसार हजर होते. मात्र प्रत्यक्षात कोणीच जागेवर नव्हते. एकमेव सुरक्षा कर्मचारी प्रसूतिगृहाच्या छतावर पंतग उडवत होता. नागरिकांचा गोंधळ आणि संताप बघून त्याने रुग्णालयाच्या कर्मचार्याना तातडीने मोबाइलवर संपर्क साधले. परंतु संतप्त युवकांनी त्याचा मोबाइल काढून घेतला. प्रसूतिगृहातील शुकशुकाट, मस्टरवरील हजेरीच्या नोंदी अशी सर्व बाबींचे कार्यकर्त्यांनी व्हिडीओ चित्रीकरण केले. यासंदर्भात नगरसेवक जगदीश पाटील यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिरमाडे धावपळ करीत आल्या. त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. डेकाटे यांनी सर्व प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले.