पुणे : ग्रेड पे वेतनात सुधारणा करण्यासाठी उपसचिवांची समिती नेमून इतर मागण्या महिनाभरात सोेडविण्याचे आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत लेखणीबंद आंदोलन गुरुवारी सातव्या दिवशी स्थगित करण्यात आले. या आंदोलनाचा जिल्हा परिषद व पंचायत समितीतील कामकाजावर परिणाम झाला होता.जिल्ह्यातील ९६७ कर्मचारी गेले सात दिवस आंदोलनात असल्याने कार्यालयीन व प्रशासकीय काम ठप्प झाले आहे. फायली जागेवरच पडून असून, टपालाचा खच पडला होता. हे कर्मचारी सकाळी व संध्याकाळी गेटवर जाऊन शासनाच्या विरोधात घोषणा देत असून, दिवसभर जागेवरच बसून राहतात; मात्र काम करीत नव्हते.गुरुवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैैठक झाली. यात १५ मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या ग्रेड पे मागणीसंदर्भात पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे १५ आॅगस्टनंतर बैैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे शिष्टमंडळास आश्वासन देण्यात आले. बदल्याबाबत शासन निर्णयामधील धोरणामध्ये लवकरच बदल केला जाईल, जॉबचार्ट ठरविले जाईल, पदोन्नोतीधारकास वरिष्ठ पदाची किमान मूळ वेतन मिळण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केला जाईल, अशी अश्वासने मिळाल्याने राज्य संघटनेने हे लेखणीबंद आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत असल्याचे कळविले आहे. उद्यापासून हे ९६७ कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करणार असल्याने रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांचे ‘लेखणीबंद’ आंदोलन सातव्या दिवशी स्थगित
By admin | Published: July 22, 2016 1:04 AM