बारामती : ‘‘ग्रामीण भागातील क्रिकेटपटू हे पैलू न पाडलेल्या हिऱ्याप्रमाणे आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर चांगले खेळाडू तयार होतील. बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे मैदान हिरवेगार ठेवण्यासाठी जितके पाणी द्यावे लागते. तितका घाम या मैदानावर गाळा, क्रिकेटच्या माध्यमातून बारामतीचे नाव देशात उज्ज्वल करा. मुलांबरोबर मुलींनीदेखील क्रिकेट खेळले पाहिजे,’’ असा संदेश मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी दिला.येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा आज बारामतीत झाला. या वेळी बारामतीकरांशी दिलखुलास संवाद साधला. माजी केंद्रीय मंत्री तथा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के, नगराध्यक्ष योगेश जगताप, उपनगराध्यक्षा ज्योती बल्लाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सचिन तेंडुलकर यांच्यासमवतेच अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, वसिम जाफर, चंद्रकांत पंडित यांच्यासह अनेक मान्यवर क्रिकेटपटूंनी या लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावली. अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात आलेल्या हिरव्यागार हिरवळीचे मैदान अल्हाददायक होते. सचिन म्हणाला, ‘‘शरद पवार यांनी भारतीय क्रिकेटसाठी जे योगदान दिले. त्याबद्दल बोलू तितके कमी आहे. मुंबईमध्ये मी खेळायचो तेव्हा पावसाळ्यात सराव करण्याची अडचण होती. आम्ही चिखलात बांद्रयाच्या स्टेडियमवर काही काळ सराव केला. शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यावर आमची समस्या कायमची सोडविली. तेथे मी नंतर अनेक वर्षे सराव केला. मोठे क्रिकेटपटू घडण्यासाठी त्यांच्या सरावासाठी चांगले मैदान मिळणे गरजेचे आहे. बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा नवोदित खेळाडूंनी घ्यावा. फक्त मुलांनीच क्रिकेट खेळावे, असे नव्हे, मुलींना देखील क्रिकेटमध्ये संधी द्यावी.’’ शरद पवार म्हणाले, ‘‘बारामतीतून भारतीय क्रिकेट संघातून खेळून देशासोबतच बारामतीचेही नाव उज्ज्वल करण्याच्या जिद्दीने बारामतीतील मुले व मुलींनीही क्रिकेट खेळावे. मुलांसोबतच मुलींचाही संघ बारामतीत निर्माण व्हावा. या संघाने राज्य, विदेशातील एक महत्त्वाचा संघ म्हणून नावलौकिक प्राप्त करावा.’’उदयोन्मुख खेळाडूंना या मैदानावर मोफत खेळू द्यावे, अशी सूचनाही पवार यांनी नगरपालिकेला या वेळी केली. नदीम मेमन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक व अन्य सहकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पवार यांनी त्यांची प्रशंसा केली. या वेळी सुप्रिया सुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक योगेश जगताप यांनी केले. राजेंद्र बनकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जावईबापू क्रिकेट खेळता का...?शरद पवार यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणीतील किस्सा सांगितला, ‘‘माझ्या लग्नात माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट उपस्थित होते. त्यांनी त्या वेळी मला विचारले, ‘जावईबापू क्रिकेट खेळता का, तुमचे सासरे सदू शिंदे माझ्याबरोबर पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आदी देशांच्या विरोधात खेळले आहेत.’ त्यावर मी उत्तर दिले, ‘या वयात तर क्रिकेट खेळू शकत नाही, परंतु क्रिकेटला प्रतिष्ठा मिळवून देईल, असे काहीतरी करेन. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपर्यंतचे अध्यक्षपद भूषविताना क्रिकेटला प्रतिष्ठा मिळवून दिली.’’