पुणे : संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून त्यातून झालेले परिवर्तनही दिसत आहे. संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले.
महाराष्ट्रातील संघ परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती, पुढील संकल्प याविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्यस्तरीय समन्वय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, संघाचे अखिल भारतीय अधिकारी संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे, कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी, डॉ. अशोक कुकडे, कुटुंबप्रबोधन प्रमुख रवींद्र जोशी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेसिया, क्षेत्र कार्यवाह सुनीलभाई मेहता, विज्ञानभारती राष्ट्रीय संघटनमंत्री जयंतराव सहस्त्रबुद्धे, भारतीय मजदूर संघाचे उदयराव पटवर्धन, राष्ट्र सेविका समितीच्या सुनीला सोवनी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. दादासाहेब बेंद्रे आदी बैठकीला उपस्थित होते.
भागवत म्हणाले, संघाकडून समाजाच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे राष्ट्रीय विचारांच्या सर्व संघटनांची जबाबदारीही वाढली आहे. आपल्या कुटुंबात व समाजामध्ये कुटुंबप्रबोधनाद्वारे मूलभूत राष्ट्र भावना वाढीस लागेल असे संस्कार होण्याची गरज आहे.
संघकामाचा गावपातळीपर्यंतचा विस्तार, सेवाकार्यांचा आढावा, यातून समाजातील अंत्योदयाच्या कल्याणाचा विचार करताना सामना करावा लागत असलेली आव्हाने, त्यावरील उपाय तसेच पुढील वाटचालीतील संकल्प या व अशा अनेकविध पैलूंवर बैठकीत विस्ताराने चर्चा करण्यात आली, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात यांनी दिली.