पुणे : महापालिकेच्या गेले अनेक महिने थंड असलेल्या अतिक्रमण विभागाला अखेर जाग आली. जंगलीमहाराज रस्ता तसेच पुणे-मुंबई रस्त्यावर कामगार कार्यालयाजवळ शुक्रवारी कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईत दोन्ही रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. जंगलीमहाराज रस्त्यावर विक्रेते व महापालिकेचे अधिकारी यांच्यात वाद झाला; मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे तो चिघळला नाही.अतिक्रमण खात्याचा स्वतंत्र कार्यभार एखाद्या अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक असताना आयुक्त कुणाल कुमार यांनी तो उपायुक्त संध्या गागरे यांच्याकडे सोपवला आहे. त्यांच्याकडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचाही उपायुक्त म्हणून कार्यभार आहे. कोणता कारभार मुख्य व कोणता अतिरिक्त, याची प्रशासनालाही खबरबात नाही. त्यामुळेच गेले अनेक महिने अतिक्रमण विभाग सुस्तच होता. या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारींमुळे अखेर या विभागाला जाग आली व शुक्रवारी सकाळपासूनच कारवाई सुरू झाली.घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त नितीन उदास यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण श्याम अवघडे व सहायक क्षेत्रीय अधिकारी भीमाजी शिंदे यांनी ही कारवाई केली. विक्रेत्यांनी या कारवाईला एकत्रितपणे विरोध करण्याचा प्रयत्न केला. पुणे-मुंबई रस्त्यावर कामगार कार्यालयाजवळही अशीच कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण खात्याला जाग
By admin | Published: April 08, 2017 1:26 AM