मुंबई : मेल-एक्स्प्रेसच्या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांच्या आसनांवरच अतिक्रमण करत रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दादागिरी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असा अनधिकृत प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रवाशांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली. २०१६ मध्ये पश्चिम रेल्वेचे ३३ कर्मचारी तिकीट तपासनीसांच्या जाळ्यात अडकल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. यात राजधानी, आॅगस्ट क्रांती या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांचा प्रवास होत आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांच्या आसनांवर प्रत्यक्षपणे रेल्वेचे कर्मचारीच प्रवास करतात. याबाबत प्रवाशांकडून त्यांना जाब विचारला असता कर्मचाऱ्यांकडून त्याला उत्तर न देता बिनदिक्कतपणे प्रवास केला जातो. यासंदर्भात प्रवाशांकडून रेल्वेकडेही अनेक तक्रारी करण्यात येतात. त्याची दखल घेत कारवाईही केली जाते. २०१६ मध्ये मुंबई सेंट्रल येथून सुटणाऱ्या वलसाड, आॅगस्ट क्रांती, राजधानी एक्स्प्रेसमध्ये हे प्रकार सर्रासपणे घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पश्चिम रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. यात जवळपास ३३ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅकमन, टेक्निकल, खलाशी, हेल्पर, कार्यालय अधीक्षक, फिटर इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात प.रे.च्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून त्यांच्या रेल्वेतील संबंधितकार्यालयांना पत्र पाठवून कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रवासाची रक्कम वसूल करतानाच त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाईही करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाकडून ज्या मार्गावरून नियमितपणे कर्मचारी प्रवास करत असेल त्या मार्गाचा पास दिला जातो. मात्र त्या मार्गाचा पासही कर्मचाऱ्यांकडे नव्हता. तसेच तिकीटही नसतानाही प्रवाशांच्या आरक्षित आसनांवरून त्यांनी प्रवास केला. (प्रतिनिधी)
प्रवाशांच्या आसनांवर कर्मचाऱ्यांचे ‘अतिक्रमण’
By admin | Published: February 16, 2017 4:53 AM