कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मुख्य रस्ते, चौक तसेच पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. त्यापुढे जाऊन आता त्यांनी केडीएमटीच्या बसथांब्याचाही ताबा घेतल्याचे डोंबिवलीतील नेहरू रोडवर दिसते. विशेष म्हणजे, या रस्त्याने बस धावत नाही. मात्र, केवळ जाहिरातींसाठी हा थांबा उभारण्यात आला आहे. बेभरवशाच्या कारभारामुळे केडीएमटीचे धिंडवडे निघत आहेत. मध्यंतरी डोंबिवलीतील टंडन रोडवरील बसथांबाच चोरीला गेल्याची तक्रार मनसेने रामनगर पोलीस ठाण्यात केली होती. यावर, शिवसेनेचे परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी बसथांबा नादुरुस्त झाल्याने तेथून तो हटवल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी बसथांब्याकडे केडीएमटी उपक्रमाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुन्हा नेहरू रोडवरील बसथांब्यावर फेरीवाल्यांचे झालेले अतिक्रमण पाहता समोर येते. या ठिकाणाहून एकही केडीएमटी बस जात नसताना हा बसथांबा कोणासाठी उभारला, असा सवाल उपस्थित होत आहे. या थांब्यावर भल्यामोठ्या जाहिराती लावण्यात आल्याने केवळ त्यासाठीच हा थांबा उभारल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसभर फेरीवाले तर रात्रीच्या सुमारास गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा या बसथांब्यात वावर असतो. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. (प्रतिनिधी)तत्काळ हटवा : परिवहनचे शिवसेना सदस्य दत्तकुमार खंडागळे यांनीदेखील ही एकंदरीत परिस्थिती पाहताकेडीएमटी व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. केवळ जाहिरातींसाठी उभारलेला आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण झालेला हा थांबा तत्काळ हटवावा, अशी मागणी व्यवस्थापनाकडे करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
केडीएमटीच्या बसथांब्यावरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण
By admin | Published: June 13, 2016 4:06 AM