चेतन ननावरे, मुंबईहिंगोलीतील कसणाऱ्या वनजमिनी मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या एका ८२ वर्षाच्या आंदोलकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मारुती पांडववीर असे त्यांचे नाव असून पाच फेबु्रवारीपासून ते सहकाऱ्यांसमवेत उपोषणाला बसले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना ९ फेबु्रवारीला जी.टी.रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्यांचे १९ फेब्रुवारीला निधन झाले. दरम्यान, वनविभागाने दिलेल्या आश्वासनानंतर १० फेबु्रवारीला आंदोलन स्थगित करण्यात आले होते.हिंगोलीमधील औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील १९ मागासवर्गीय भूमिहीन शेतकऱ्यांनी ५ फेब्रुवारीला आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. चाळीस वर्षांपासून वनखात्याच्या ज्या जमिनी शेतमजूर कसत आहेत, त्या शासनाने शेतमजुरांच्या नावावर करून देण्याची त्यांची मागणी होती. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे नेतृत्व मारुती पांडववीर करत होते. कसणारी जमीन मिळवण्यासाठी पांडववीर यांनी केलेल्या आंदोलनांमुळे १९६८, १९६९ आणि १९७० साली तब्बल तीनवेळा तुरुंगवासही भोगला होता. त्यानंतर कसणाऱ्या ५ एकर जमिनीच्या मोबदल्यात सरकारने ३१ गुंठे जमीन नावावर करून त्यांची खिल्ली उडवली होती.
आंदोलक दलित शेतक-याचा अंत
By admin | Published: February 27, 2015 2:49 AM