सिंदखेडराजा (बुलडाणा): भरधाव ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने जालना जिल्ह्यातील एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर-पूणे या महामार्गावरील किनगावराजानजिक रविवारी सकाळी घडली. अपघात एवढा भीषण होता की, महिलेचा घटनास्थळीच गर्भपात होऊन तिच्या आठ महिन्यांच्या अर्भकाचाही करूण अंत झाला.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील विकास आणि अश्विनी शिंदे अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी ही सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील संजय देवराव खरात यांची मुलगी होती. भोकदरन तालुक्यातील लोणगाव येथील विकास शिंदे यांच्याशी काही वर्षापूर्वी तिचे झाले होते. ती ८ महिन्यांची गर्भवती होती. भाऊबिजनिमित्त एकूलत्या एक भावाला ओवाळण्यासाठी अश्विनी जांभोरा येथे माहेरी आलेली होती. दिवाळी आटोपून २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता विकास आणि अश्विनी एमएच २८ एम ३३0९ क्रमांकाच्या मोटारसायकलने जांभोरा येथून लोणगावसाठी निघाले होते. गावापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या किनगावराजानजिक केए 0८-३९0६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. या अपघातात विकासच्या मेंदुला जबर मार लागला. त्यांचा आणि पत्नी अश्विनी हिचादेखील घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांच्या रक्तामांसाचा सडा तिथे पडला होता. अपघातामुळे अश्विनीचा आठ महिन्यांचा गर्भ पोटातून बाहेर पडून त्याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले. एका वाहन चालकाने ट्रकचा पाठलाग करुन चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले. *अपघाताने दिला मृत्यूला जन्मया अपघातात आठ महिन्यांची गर्भवती अश्विनी हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा धक्का एवढा जबर होता की, तिच्या गर्भातील ८ महिन्यांचे अर्भक बाहेर पडले. अवघ्या महिनाभरात जी माता बाळाला जन्म देणार होती, त्या मातेला दूर्दैवाने मृत्यूलाच जन्म द्यावा लागला. सोशल मिडियावर या अपघाताची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर अनेकांची मने हेलावून गेली.
अपघातात जालन्याच्या दाम्पत्यासह अर्भकाचाही अंत
By admin | Published: November 23, 2015 1:39 AM