ऑनलाइन लोकमतचपळगाव, दि. ८ : पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले़ दुष्काळी स्थिती अजूनही संपलेली नाही़ पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्ती, गावात येत आहेत़ बोरगाव (ता़ अक्कलकोट) येथे एक माकड पाण्याच्या शोधात आले़ मात्र ग्रामस्थांना पाहून ते भयभीत झाले़ या घरावरून-त्या घरावर, झाडावर उड्या मारू लागले़ दरम्यान विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला त्याचा धक्का बसल्याने शॉक लागून ते जागीच मयत झाले़ ग्रामस्थांनी त्याची अंत्ययात्रा काढण्याचे ठरविले़ ही वार्ता परिसरातील गावात पसरली़ अन् या माकडाच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला़
बोरगांव (दे) येथे इंदिरानगर येथून शुक्रवारी सकाळी या माकडाची अंत्ययात्रा निघाली़ गावात एखादी व्यक्ती मयत झाली की, अख्ख गाव अंत्ययात्रेसाठी एकत्रित येते, त्याप्रमाणे गावातील बालगोपाळापासून ते वृद्धापर्यंत त्या मृत माकडाला पाहण्यास येत होते़ माणसाप्रमाणे त्या मृत माकडास विधीवत अंघोळ घालून, मयतीचा कपडा, टॉवेल-टोपी, साडी-चोळी, काकण असा संपूर्ण आहेर करून पुष्पहार घालून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सवाद्य अंत्ययात्रा काढण्यात आली़ यात शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते़ गावातील मारूती मंदिर येथे त्याचे दफन करण्यात आले़