गोसेखुर्द : मुख्य सचिवांचे आदेशनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मुख्य सचिव जे. एस. सहारिया स्वत: जातीने लक्ष घालत आहे. नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातील जीवनापूर, सिर्सी, खराडा व पांजरेपार या चार गावांना ३० जूनपर्यंत स्थलांतरण करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.गोसेखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतला आहे. गावांचे स्थलांतरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मुख्य सचिव सहारिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. बाधित क्षेत्रातील नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, सिर्सी, खराडा व पांजरेपारा या चार गावांचे स्थलांतरण ३० जूनपर्यंत करण्यास त्यांनी सांगितले आहे. पूर्व विदर्भातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सरासरी १० लाख हेक्टरमध्ये सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. शासनाने पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी १२०० कोटींचे पॅकेज दिल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त बी.व्ही गोपालरेड्डी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पॅकेजच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र अद्यापही काही अडचणी आहेत. काही गावे स्थलांतरित न झाल्याने पाण्याची पातळी वाढविण्यातही अडचणी येत आहेत. पावसाळ्यात अडचणी येण्याचा धोका लक्षात घेऊन, वरील चारही गावांचे स्थलांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत पुढील आठवड्यात पुनर्वसनासंदर्भात भंडारा येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
महिन्याअखेरपर्यंत चार गावे स्थलांतरित करणार
By admin | Published: June 11, 2014 1:23 AM