पुणे : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. महिनाभरापूर्वी त्यांचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वयाच्या नवव्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. अनेक संघर्षांना सामोरे जात त्यांनी हजारो अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारले होते. सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी घेतली. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. घराला कुलदीपक हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचे नाव चिंधी ठेवण्यात आले होते. गाव लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचे फक्त चौथीपर्यंत शिक्षण झाले होते.
महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.