सांगली : जिल्ह्याच्या तसेच राज्यातील राजकारणात स्वकर्तृत्वाने उभारलेले कर्तबगार नेतृत्व हरपले, अशा शब्दात शुक्रवारी सांगलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मदन पाटील यांना आदरांजली वाहिली. शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा निर्धार यावेळी समर्थकांनी केला. शहरातून काढण्यात आलेल्या त्यांच्या अंत्ययात्रेस नागरिकांनी गर्दी केली होती. सांगलीच्या वसंतदादा स्मारक परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव याठिकाणी पाच वाजता आणण्यात आले. संपूर्ण स्मारक परिसर समर्थक, कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरून गेला होता. पोलीस दलाने याठिकाणी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. पोलीस बँड पथकाने त्यांना सलामी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. यावेळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संजय पाटील म्हणाले की, मदन पाटील यांनी अत्यंत खंबीरपणे जिल्ह्यातील विविध संस्थांचे नेतृत्व केले. त्यांनी स्वकर्तृत्वावर कार्यकर्त्यांची फळी उभी केली. त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. पतंगराव कदम म्हणाले की, वारंवार जिल्ह्यात दादा-कदम गटाची चर्चा केली जात होती. अशी कोणतीही स्थिती आजवर नव्हती. वसंतदादांच्या विचाराने एकसंधपणे आम्ही सर्व काम करीत होतो. आमच्या पक्षातील महत्त्वाचा मोहरा म्हणून आम्ही मदनभाऊंकडे पाहत होतो. हा मोहराच आता निघून गेल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. एक धाडसी, बिनधास्तपणे काम करणारा नेता आम्ही गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, समर्थकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. आ. अनिल बाबर म्हणाले की, मितभाषी असणारा हा नेता तितकाच आक्रमकही होता. जिल्ह्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अशा कर्तृत्ववान नेत्याला आपण मुकलो आहोत. विलासराव जगताप यांनी, एक सच्चा मित्र सोडून गेल्याची भावना व्यक्त केली. आ. शिवाजीराव नाईक म्हणाले की, तरुण वयातच त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. वसंतदादा, विष्णुअण्णा यांचा वारसा त्यांना मिळाला असला तरी, ते स्वकर्तृत्वावर पुढे आले होते. सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात वेगळा ठसा त्यांनी उमटविला. कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले की, त्यांनी खऱ्याअर्थाने तरुणांचे नेतृत्व केले. वसंतदादा, विष्णुअण्णांच्या विचारांचा वारसाही समर्थपणे त्यांनी जपला. विश्वजित कदम म्हणाले की, मोठा भाऊ, मार्गदर्शक, मित्र अशा प्रत्येकदृष्टीने माझे व त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक गोष्टीत त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यामुळे मदनभाऊंच्या जाण्याने माझे व्यक्तिगतही मोठे नुकसान झाले आहे. यावेळी महापौर विवेक कांबळे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर घाडगे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, मधुकरराव चव्हाण, अॅड. अजित सूर्यवंशी, दिलीपतात्या पाटील, वैभव नायकवडी, पृथ्वीराज पाटील, बजरंग पाटील यांनीही आदरांजली वाहिली. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, आ. बाळासाहेब पाटील, गजानन कोठावळे, उपमहापौर प्रशांत पाटील, माजी आ. विलासराव शिंदे, माजी महापौर सुरेश पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पृथ्वीराज पवार, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, दिलीप चव्हाण, रणधीर नाईक, सुरेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चौका-चौकात : आदरांजलीदुपारी तीन वाजता मदन पाटील यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या वाहनात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. समोरील बाजूस मदन पाटील यांची मोठी प्रतिमा लावण्यात आली होती. ‘अमर रहे, अमर रहे, मदनभाऊ अमर रहे’, अशा घोषणा देत समर्थक सहभागी झाले होते. शहरातील प्रत्येक चौकात विविध संघटनांच्यावतीने त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांगलीतील मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राममंदिर, काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक, कापड पेठ, गणपती मंदिरमार्गे ही अंत्ययात्रा स्मारकाच्या ठिकाणी आली.वाघाची एक्झिटकाही कार्यकर्त्यांनी मदन पाटील यांच्या अंत्यसंस्कारावेळी एक फलक हातात घेऊन आगमन केले. मदन पाटील व वाघाची प्रतिमा असलेल्या या फलकावर ‘एका वाघाची एक्झिट’ असे वाक्य लिहिले होते. या फलकाने अनेकांचे लक्ष वेधले. शहरातील चौका-चौकात असे फलक दिसत होते.रक्षाविसर्जन रविवारीरविवारी, १८ आॅक्टोबर रोजी स्मारकाच्या ठिकाणीच रक्षाविसर्जन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी शोकसभाही होणार आहे. आम्ही एकत्र येणार होतो जयंत पाटील : निर्णय होताच मदनभाऊ सोडून गेले सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत मदनभाऊ व आम्ही एकत्र आलो होतो. यापुढेही जिल्ह्याच्या राजकारणात एकत्रित काम करण्याचे आम्ही दोघांनी ठरविले होते. इतक्यात ते आम्हाला सोडून गेले, अशी भावना माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी शोकसभेत व्यक्त केली. ते म्हणाले की, मुंबईतील शस्त्रक्रियेपूर्वी त्यांच्याशी मी संपर्कात होतो. गेल्या दोन दिवसांपासूनही त्यांच्या प्रकृतीची चौकशी सुरू होती. मुंबईत असताना त्यांनी माझा हात हाती घेऊन, एकत्रच राहण्याची विनंती केली होती. इतक्या दिवसांनी एकत्र आल्याने आता फारकत घ्यायची नाही, असे त्यांनी सांगितले होते. जिल्हा बँक आणि सांगली बाजार समिती निवडणुकीत आम्ही एकत्रित काम केले होते. मात्र संस्थांपुरते मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणात यापुढे एकत्रितपणे काम करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली होती. राजकीय भूमिका यापूर्वी वेगळ्या होत्या. तरीही त्यांनी कधीही व्यक्तिगत संबंधात बाधा येऊ दिली नाही. जिल्ह्यातील राजकारणातले ते आधारस्तंभ होते. आमचा आधारच आता निघून गेला आहे. यकृत प्रत्यारोपणाचा त्यांचा निर्णय धाडसी होता. राजकारणात ते त्याच धाडसाने काम करीत होते. एक वेळ अशी होती की, जिल्ह्याच्या सर्व महत्त्वाच्या संस्था मदनभाऊंच्या नेतृत्वाखाली होत्या. त्यांनी संस्थात्मक काम अत्यंत सक्षमपणे केले. त्यांची कार्यपद्धती अन्य राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने सहकाराचे, राजकीय क्षेत्राचे, तसेच त्यांच्या कुटुंबियांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)तेव्हाही एकत्रितच होतोराष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आम्ही एकत्रितच होतो. आता पुन्हा एकत्रितपणे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काम करण्याचे ठरविले होते. मात्र ते आमची साथ सोडून निघून गेले, असे जयंत पाटील म्हणाले.
अंत्ययात्रेला अलोट गर्दी
By admin | Published: October 16, 2015 11:06 PM