लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या विकासात रेल्वेचे मौलिक योगदान असूनदेखील आतापर्यंत पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला नव्हता. मात्र, आता रेल्वेच्या विकासावर आम्ही भर देत आहोत. रेल्वेला ‘इकोफ्रेंडली‘ बनविण्याचे प्रयत्न सुरू असून पाणी, ऊर्जा यांची बचत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील १० वर्षांत सौरऊर्जेचा वापर वाढवून सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या ऊर्जेची बचत करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. विदर्भातून नव्याने सुरू झालेल्या रेल्वेगाड्यांना मंगळवारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या २० योजनांचा शुभारंभदेखील करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.नागपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास आणि वन राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम उपस्थित होते. रेल्वेचे काम प्रचंड प्रमाणात वाढले, मात्र त्या तुलनेत विकास झाला नाही. प्रवाशांची क्षमता १,७४० पटींनी वाढली, तर पायाभूत सुविधा केवळ ३४ पटींनी वाढल्या. हीच बाब लक्षात घेऊन गेल्या अडीच वर्षांत आम्ही रेल्वेच्या विकासावर साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक केली. रेल्वेची क्षमता वाढविण्यावर आमचा भर आहे. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन योजना राबविण्यात येत आहेत. ठिकठिकाणी पाणी शुद्धीकरण प्रकल्प, स्वच्छ ‘बेडरोल’ पुरविण्यासाठी ‘मेकॅनाईज्ड लॉन्ड्री’, दोन रुपयांत शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभू यांनी दिली. नागपुरातील अजनी व गोधनी ही भविष्यात मोठी रेल्वे स्थानके होतील. गडचिरोली-वडसा या रेल्वेमार्गामुळे आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल. अजनी व खापरी स्थानकांचा विकास ‘मल्टिमॉडेल हब’ म्हणून करण्यात येईल. त्यासाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करण्याची आमच्या मंत्रालयाची तयारी आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर-नागभीड ‘ब्रॉडगेज’ला लवकरच ‘नीती’ आयोगाची मंजुरी मिळेल व याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असेदेखील त्यांनी सांगितले.
रेल्वे करणार ४० हजार कोटींच्या ऊर्जेची बचत
By admin | Published: May 10, 2017 2:25 AM