हितेन नाईक,
पालघर- दांडी येथून तीन दिवसांपासून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या गीतांजली या नौकेचे इंजिन अचानक बंद पडले. रात्री महाकाय लाटा आणि दोरखंडात अडकून बुडण्याच्या संकटावर मात करीत मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहा मच्छीमारांची स्थानिकांनी दोन दिवसांच्या अथक परिश्रमातून शोध घेत गुजरातच्या सागरी क्षेत्रातून सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले.दांडी येथील मच्छिमार नंदकुमार तामोरे हे आपली गीतांजली हि नौका अन्य ६ खलाशांना सोबत घेऊन एकदिवसीय मच्छीमारीसाठी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निघाले. २ -३ तासांचा प्रवास केल्यानंतर प्रवाहाचा अंदाज घेत त्यांनी आपली जाळी समुद्रात सोडली. संध्याकाळी ५ वाजता त्यांनी ती नौकेत घ्यायला सुरुवात केली. रात्री १०.३० वाजता नौकेचे इंजिन बंद पडले. त्यामुळे ती वाहत जाऊ लागली. या दरम्यान उत्तरे कडून जोरात वारे वाहू लागल्याने नौका भरकटू लागली. त्यांच्या कडे वायरलेस सेट नसल्याने आणि त्यांच्या जवळील मोबाईल ची बॅटरी हि संपल्याने त्यांचा घराशी संपर्क तुटला. एखादी मच्छिमार नौका आली की त्याची मदत घेऊ असा विचार करून ते वाट पाहू लागले. मात्र मोठमोठी व्यापारी जहाजे आजूबाजूने जात असल्याने ओरडून, बोटीतील लाईटच्या सहाय्याने त्यांना दूर जाण्याचा इशारा करीत होते. शेवटी त्यांनी नौकेतील कापडाचा एक शीड बनवून त्याच्या सहाय्याने किनारा गाठता येतो का? ह्यासाठी प्रयत्न सुरु केला. ह्याच वेळी समुद्रातील महाकाय खडकांचा मागोवा घेत ते डोळ्यात तेल टाकून रात्रीच्या मिट्ट काळोखात लक्ष देत होते. प्रवाह नेईल त्या दिशेने प्रवास चालला असताना अचानक ती एका बाजूला कलंडली. आपली नौका दोरखंडात अडकल्याची जाणीव होऊन तामोरेंसह अन्य दोन मच्छीमारांनी समुद्रात उड्या घेतल्या. कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी आपल्या कवी रोवताना समुद्रात सोडलेल्या फुग्याच्या (बुडडी) दोरखंडात नौकेचा पंखा व सुकाणू सापडल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी सुरे घेऊन ते दोरखंड कापून टाकल्या नंतर कलंडलेली नौका सरळ झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.सकाळी मच्छीमारीला गेलेली नौका रात्र झाली तरी परत बंदरात न आल्याने सर्वांच्या घरात काळजीचे सावट पसरले. वायरलेस सेट वरून सातपाटी, डहाणू, मुरबे इ. भागातील नौकाना संपर्क करून गीतांजली चा शोध घेण्याबाबत सांगण्यात आले. मात्र सकाळ पर्यंत काहीच पत्ता लागत नसल्याने शेवटी त्या नौकेचा शोध घेण्यासाठी मोरया प्रसाद आणि कल्पतरू ह्या दोन नौकांसह २० ते २५ मच्छिमार वसई आणि उंबरगावच्या दिशेने निघालो. अखेर संध्याकाळी ४.३० वाजता गीतांजली नौका उंबरगावच्या समोरील सागरी प्रवाहात वहात जात असल्याचे त्यांना दिसून आली. अन्न, पाण्या वाचून तीन दिवस व्याकुळलेल्या गुरूदत्त म्हात्रे, बबलू , वसंत गोवारी , चंद्रकांत पागधरे , भीमा आरेकर यांना आपल्या नौकेत घेऊन माघारी फिरले आणि ते सर्व सुखरूप े दांडी च्या किनाऱ्यावर पोहोचल्या नंतर सर्व कुटुंबीयांनी, आणि गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगामुळे बोटीवर वायरलस सेट असण्याचे महत्व स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)>वायरलेस, नाही तर हॅम सेट तरी पाहिजेअसा प्रसंग कोणत्याही नौकेवर कधीही येऊ शकतो. हे लक्षात घेऊन खोल समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक मच्छीमार बोटीवर उत्तम क्षमतेचा वायरलेस सेट किंवा हॅम रेडिओ सेट असणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट झाले आहे. तटरक्षक दलाची मदत तत्परतेने आणि पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही असा अनुभव यापूर्वी अनेकदा आल्यामुळे वरील दोन पैकी एक संच बोटीवर असणे अनिवार्य करण्याची गरज आहे.