पुणे : ‘धुरांच्या रेषा हवेत काढणाऱ्या’ आणि भारतील रेल्वेच्या देदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वाफेवरील रेल्वे इंजिनाला नवी झळाळी मिळाली आहे. काही वर्षांपासून अडगळीत पडलेल्या या साठीतल्या इंजिनाचा समृद्ध वारसा पुन्हा अनुभवता येणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयासमोर हे इंजिन नव्या रूपात सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते शनिवारी (दि. ७) या इंजिनचे अनावरण केले जाणार आहे. हे इंजिन १९५४ मध्ये इंग्लंडमधून भारतात आणण्यात आले आहे. वाफेवरील हे इंजिन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पुलगाव ते आर्वी या नॅरोगेज मार्गावर धावत होते. १९८५ पर्यंत हे इंजिन रेल्वेच्या सेवेत होते. त्यानंतर तांत्रिक कारणांमुळे इंजिनाचा वापर थांबविण्यात आला. त्यानंतर काही वर्षे हे इंजिन पुलगाव येथेच होते. त्यानंतर ते लोणावळा येथे आणण्यात आले. अनेक वर्षे याठिकाणी हे इंजिन अडगळीत पडले होते. (प्रतिनिधी)कार्यालयाच्या सौंदर्यात पडली भरपुणे विभागाने सहा महिन्यांपूर्वी हे इंजिन घोरपडी येथील डिझेल लोको शेडमध्ये आणले. रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या इंजिनाला झळाळी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गंजलेला लोखंडी पत्रा, धुराडी तसेच इतर गोष्टींची जुळवाजुळव, रंगरंगोटी तसेच काही नवीन बाबींची जोड देऊन या इंजिनाला झळाळी देण्यात आली आहे. हे इंजिन पुणे विभागीय कार्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या सौंदर्यातही भर पडली आहे.
साठीतल्या इंजिनाला मिळाली झळाळी
By admin | Published: January 07, 2017 12:59 AM