रत्नागिरी/बेळगाव/मुंबई : मुंबईत नोकरी करणा-या अभियंता तरुणीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याप्रकरणी दोन संशयित मंगळवारी रात्री रत्नागिरी पोलीस ठाण्यात शरण आले. निखिलेश प्रकाश पाटील (२५, नागपूर) व अक्षय अनिल वालुदे (२४, नागपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ठेकेदार नीलेश भाऊराव खोब्रागडे (वय ३८, नागपूर) यांनी फिर्याद दिली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता कनोजिया ही मूळची नागपूर येथे राहणारी तरुणी आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून ती गेल्या २५ दिवसांपासून ठाणे येथील एका कंपनीत नोकरी करीत होती. तेथीलच एका खासगी वसतिगृहात ती राहत होती. नागपूर येथील ठेकेदार नीलेश खोब्रागडे हे निखिलेश पाटील (नागपूर) याला घेऊन ३ सप्टेंबरला कारने एका बैठकीसाठी मुंबईला निघाले होते. प्रवासादरम्यान अंकिताने मित्र निखिलेशला फोन केला. त्यावेळी अंकिता ही पुण्यात होती. त्यामुळे निखिलेशने पुणेमार्गे येऊन अंकिताला गाडीत घेतले. ४ सप्टेंबरला ते ठाणे येथे पोहोचले. तेथील निखिलेशचा मित्र अक्षय वालुदे (मूूळ नागपूर) याच्या खोलीवर गेले. ठाण्याला आल्यानंतर ठेकेदार नीलेश खोब्रागडे आपल्या कामाला निघून गेले. ठाणे येथे उतरल्यानंतर तासाभरातच निखिलेश व अक्षय यांनी अंकितावर जबरदस्ती केली. तिने आरडाओरडा केल्याने तिचा गळा दाबण्यात आला. त्यातच तिचा मृत्यू झाला.त्यानंतर तिचा मृतदेह प्रवासी बॅगेत ठेवला. निखिलेशने फोन करून गोवा येथे फिरायला जायचे असल्याचे खोब्रागडेंना सांगितले. तिघेही बेळगावमार्गे गोव्याला निघाले. बेळगावजवळ आल्यानंतर झोप आल्याने गाडी थांबवून चालक झोपला. ही संधी साधूनकाकती येथील राणी चन्नमा विद्यापीठाजवळील एका पाण्याच्या चेंबरमध्ये दोघांनी मृतदेह असलेली बॅग टाकली. त्यानंतर ते गोव्याला रवाना झाले. गोव्यात गेल्यानंतर गाडीत बॅग नाही हे खोब्रागडेंच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता अंकिताचा खून करून मृतदेह वाटेत टाकल्याचे दोघांनी सांगितले. हे एकून खोब्रागडे अस्वस्थ झाले. पहाटेच तिघेही गोव्याहून निघाले. खोब्रागडेंनी संशयितांसह गाडी हातखंबा येथून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आणून फिर्याद दिली. त्यानंतर दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली.दरम्यान, प्रकरणातील गूढ लक्षात घेऊन पोलीस विविध बाजूने तपास करीत आहेत. ठाणे पोलिसांचे एक पथक देखील तपासासाठी बेळगावला आले आहे.
अत्याचार करून अभियंता तरुणीचा खून, मृतदेह बेळगावजवळ टाकला; दोन संशयिताना रत्नागिरीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 3:10 AM