नांदेड : एका कनिष्ठ अभियंत्याला अवघ्या ४५ मिनिटांसाठी बढती मिळाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्यात पुढे आला. बांधकाम खात्याच्या एकूणच कारभाराबाबत अभियंत्यांमधून ओरड पाहायला मिळते. बदल्या, बढत्या, निधी, प्रलंबित देयके आदी विविध प्रश्न आहेत. बढत्यांसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. राज्यातील ५८८ कनिष्ठ अभियंत्यांच्या बढत्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. दिगांबर पाटील या कनिष्ठ अभियंत्याला ३० नाेव्हेंबर राेजी उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) या पदावर पदाेन्नती देण्यात आली. काेकण विभाग-१ येथे असलेल्या पाटील यांना पदाेन्नतीवर जव्हार जि. पालघर येथे नियुक्त करण्यात आले. आदेश उशिरा मिळाल्याने पाटील हे धावत पळत जव्हार येथे सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी पाेहाेचले. नव्या पदाचा कार्यभार स्वीकारताच ४५ मिनिटांनी अर्थात सायंकाळी ५.३० वाजता ते सेवानिवृत्त झाले. एवढ्या कमी वेळेसाठी बढती मिळालेले कदाचित राज्यातील हे एकमेव अधिकारी असावेत.
सकाळी बढती, सायंकाळी निवृत्तीएका पाेलीस निरीक्षकाची बढती औटघटकेची ठरली. विकास रामराव रामगुडे हे नवी मुंबई पाेलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. त्यांना ३० नाेव्हेंबर राेजी पाेलीस उपअधीक्षक पदावर बढती देऊन मुंबईतच नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले. सकाळी पदाेन्नती, सायंकाळी सेवानिवृत्तीचा अनुभव रामगुडे यांना आला.