नागपूर : यावर्षी इंजिनिंयरिग प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना सोबत जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडण्याची अट घालण्यात आली होती. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. आ. परिणय फुके यांनी हा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मांडला. तावडे यांनी याची दखल घेत इंजिनियरिंगचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत १९ जून वरून वाढवून २३ जून केली आहे. इंजिनियरिंग प्रवेशासाठी १९ जून हा प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. एवढ्या कमी वेळात ओबीसी विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कसे सादर करतील, असा प्रश्न ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोशल मिडियावर उपस्थित केला होता. तशा पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. आ. परिणय फुके यांनी असाच एक मॅसेज सोशल मिडियावर पाहिला व तो लगेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठवून या प्रश्नावर मार्ग काढण्याची विनंती केली. जात पडताळणी प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ही किचकट असून, बराच वेळ घेणारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंतीही आ. फुके यांनी शिक्षणमंत्री तावडे यांना केली. याची दखल घेत शिक्षणमंत्री तावडे यांनी इंजिनियरिंगसाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत २३ जूनपर्यंत वाढविण्यात येईल व आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी वाढीव सात दिवस दिले जातील, असे आश्वस्त केले. यासंबंधीची अधिसूचनाही त्वरित काढली जाईल, असेही स्पष्ट केले. आ. फुके यांनी शिक्षणमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत करीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकरात लवकर जात पडताळणी व नॉन क्रिमिलियरसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
इंजिनियरिंग प्रवेश अर्ज भरण्यासाठी २३ तारखेपर्यंत मुदत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 4:14 PM