ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - वैद्यकीय प्रवेशासाठी होणा-या नीट प्रवेशपरिक्षेच्या धर्तीवर आता इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरसाठी देशपातळीवर एकच प्रवेशपरिक्षा होणार आहे. पुढच्यावर्षी 2018 पासून ही प्रवेशपरिक्षा सुरु होईल. इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरसाठीच्या प्रवेशपरिक्षेच्या प्रस्तावला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. डोनेशनचा प्रभावी कमी करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात एकसमानता आणणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. यामध्ये आयआयटीचा समावेश केलेला नाही. आयआयटीची स्वतंत्र प्रवेश परिक्षेची प्रक्रिया सुरु राहिल.
प्रवेश प्रक्रिया राबवताना एआयसीटीईला भाषेची विविधता लक्षात घेण्याचे निर्देश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. नीट प्रमाणे इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरची प्रवेश परिक्षा वेगवेगळया भाषांमध्ये होईल असे एआयसीटीईमधील सूत्रांनी सांगितले.
सध्या काही राज्यांची इंजिनीअरिंगच्या शाखेला प्रवेश देण्यासाठी स्वत:ची प्रवेशपरिक्षा आहे तसेच काही राज्यांमध्ये बारावीच्या मार्कांच्या आधारावर प्रवेश दिला जातो. 27 राज्यांमध्ये 3288 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्यात सर्वाधिक तामिळनाडूमध्ये (527) त्या खालोखाल महाराष्ट्र (372), उत्तरप्रदेश (295) आणि मध्यप्रदेशात (211) कॉलेजेस आहेत.