खंडाळा (जि.सातारा) : ‘नायगाव हे प्रेरणास्थान आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मांडलेले आदर्श विचार अंगीकारणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. नायगावच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. १ कोटी ८६ लाखांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सावित्रीबार्इंच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी नायगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व नायगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)सातबाऱ्यावर महिलांचे नाव...जमिनीला पतीबरोबर सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव नोंदविण्याबाबतचा ‘लक्ष्मी मुक्तीचा’ शासकीय अध्यादेश जारी झाला आहे. यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साताबाऱ्याला सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव लावण्यास लेखी परवानगी देऊन सावित्रींच्या लेकींचा सम्मान केला. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्या माध्यमातून सातबाऱ्यावर नाव लागलेल्या महिलांना नायगाव येथील कार्यक्रमात सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले.
नायगावमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2017 2:45 AM