युनूस शेखइस्लामपूर : कृषी संस्कृतीतील बैलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत येथील राजारामबापू इन्स्टिट्यूड ऑफ टेक्नालॉजी (आरआयटी) मधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मानेवरील ओझे कमी करणारी बैलगाडी तयार करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट दिली आहे.महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विध्यार्थ्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलाच्या मानेवरील ओझे कमी करणारी किमया साधली आहे.शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कॅपस्टन प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या संकल्पना वर काम करण्याची संधी मिळते. त्यांनी चालू घडीला अवघड आव्हानाची निवड करत असताना जवळच असलेल्या राजारामबापू साखर कारखान्यासाठी होत असलेल्या ऊस वाहतूकीत बैलगाड्यांना येणाऱ्या समस्यावर संशोधन करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरविले. या संशोधक विद्यार्थ्यांनी 'सारथी' या नावाने आपला हा प्रकल्प पूर्ण केला.महाराष्ट्रात जवळपास सहकारी आणी खाजगी मालकीचे एकूण 200 साखर कारखाने सुरू आहेत, त्यातील बहुतांश बैलगाडया जवळच्या भागातून ऊस वाहतूक करत असतात. प्रामुख्याने शेतात ऊस भरताना लावण्यात आलेला लाकडी घोडा जमीनीत घुसणे व मोडणे, बैलांवर अतिभार, रस्त्यांवरील गतिरोधक, खड्यांमुळे पाय घसरने, पाय मुरगळणे व कधी कधी पाय मोडणे अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड दयावे लागते. यामुळे बैलाला दुखापत तसेच बैल चालकाचे आर्थिक नुकसान होते. यावर त्यांनी अफलातून संकल्पना तयार करत कामाला सुरवात केली.त्यांनी दोन्ही बैलांच्यामध्ये तिसरे चाक बसवले जे बैलांवरचा भार कमी करते आणि बैलगाडीसाठी पूर्ण संतुलन देते, हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार कमी-जास्त आणि वर खाली करू शकतो. तसेच याचा उपयोग ऊस भरताना खाली व शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो.त्यातून बैलांवरील ओझे कमी करण्यात यश आले आहे.या प्रकल्पाची चाचणी ऊस भरताना व रस्त्यावरून वाहतूक करताना करण्यात आली आहे. येणाऱ्या गळीत हंगामात या प्रयोगाची प्राथमिक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.पेटेंटसाठी अर्जसंशोधन निधी अंतर्गत लीड कॉलेज स्कीम,शिवाजी विद्यापीठातून या प्रकल्पासाठी १० हजार रुपये निधी मिळाला आहे. या रोलिंग सपोर्ट प्रकल्पाचे पेटेंट मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.डॉ. सुप्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर प्रा. पी. एस. घाडगे व ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख डॉ.एस.आर.कुंभार यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ए.बी. काकडे, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील यांनी अभिनंदन केले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. आर डी. सावंत व नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:19 PM