ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालण्यासाठी ठेकेदारांएवढेच अभियंत्याही जबाबदार धरत प्रशासनाने कठोर पावलं उचलली़ खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांकच जाहीर करण्यात आले़ मात्र अभियंत्यांनी असहकार पुकारुन पालिकेची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना कार्यालयीन मोबाईल देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा खणखणारा फोन उचलणे अभियंता भाग पडणार आहे़
३५२ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक झाल्यानंतर अभियंतावर्गातून नाराजीचा सूर उमटत होता़ त्यानंतर ठेकेदारांकडून दंड वसूल करुन त्यांच्या सुटकेचा मार्ग खुला करणाऱ्या सहापैकी दोन कार्यकारी अभियंत्यांना पालिकेने निलंबित केले़ या अभियंत्यांना निलंबित करण्यापूर्वी त्यांची खातेनिहाय चौकशी करावी़ त्यात दोषी आढळल्यानंतरच कारवाई करणे उचित होते, असा युक्तिवाद अभियंत्यांनी मांडला आहे़
मात्र पालिका प्रशासनाने खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या सर्व अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक परस्पर जाहीर केल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे़ आपला मोबाईल क्रमांक व्यक्तिगत असल्याने कार्यालयीन कामासाठी त्याचा वापर करण्यास अभियंत्यांनी नकार दिला आहे़ नागरिकांच्या तक्रारींचा फोन उचलणे अभियंत्यांनी बंद केले आहे़ त्यामुळे प्रशासनाने नगरसेवक व खातेप्रमुखांनंतर आता खड्डयांची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांनाही मोबाईल देण्याचा निर्णय घेतला आहे़ प्रतिनिधी चौकट अभियंत्यांच्या तक्रारींची पहिली खबर व्यक्तिगत मोबाईल क्रमांक पालिकेने परस्पर जाहीर केल्यामुळे अभियंता नाराज आहेत़
यापैकी काही अभियंत्यांनी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून आपला व्यक्तिग मोबाईल क्रमांक कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यास नकार कळविला होता, याची पहिली खबर लोकमतने दिली होती़ अभियंत्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप नसल्याचेही निदर्शनास आणले होते़ यासाठी देणार स्मार्ट फोन व्यक्तिगत मोबाईल क्रमांक पालिकेने जाहीर केल्यानंतर सतत फोन खणखणत असल्याने अभियंत्यांनी असहकार पुकारला आहे़ काही अभियंता फोन उचलत नसून काहींनी आपला मोबाईल बंद ठेवला आहे़ त्यामुळे या अभियंत्यांना कार्यालयीन मोबाईल क्रमांक देण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ त्यानुसार ५४ नवीन स्मार्ट फोन खरेदी करण्यात येणार आहेत़
हे मोबाईल केवळ पावसाळ्यात खड्डेसंदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी असणार आहेत़ त्यानंतर हे फोन संबंधित वॉर्डातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येतील़ अॅपचा ताप खड्डयांच्या तक्रारी करण्यासाठी २०११ पासून विशेष संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते़ खड्ड्यांचे छायाचित्र काढून या संकेतस्थळावर टाकणे सोपे होते़ तसेच अभियंत्यांनाही त्याची दखल घेणे भाग असल्याने हे संकेतस्थळ खड्ड्यांच्या तक्रारींसाठी प्रभावी माध्यम ठरले होते़
मात्र या संकेतस्थळाबरोबर असलेले कंत्राट संपुष्टात आल्यामुळे पालिकेने यावर्षी अॅप सुरु केला आहे़ मात्र तांत्रिक अडचणींमुळे या अॅपवर खड्ड्यांची तक्रार करणे नागरिकांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे़ हे विभाग खड्डेमुक्त भेंडी बाजार, भायखळा, शिवाजी पार्क, वरळी, वांद्रे, चेंबूर, दहिसर हे विभाग खड्डेमुक्त असल्याचा दावा केला जात आहे़