मुंबई : एकीकडे अमेरिकेत भारतीय तंत्रज्ञांना आडकाठी करण्याची भूमिका जोर धरत असताना दुसरीकडे ब्रिटनने भारतीय वित्तीय तंत्रज्ञांसाठी द्वार खुले केले आहे. ब्रिटनचे चान्सलर फिलीप हॅमण्ड यांनी मुंबई भेटीदरम्यान या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली.वित्तीय तंत्रज्ञानात जगातील क्रमांक एकवर असलेल्या ब्रिटनमध्ये भारतीय वित्तीय तंत्रज्ञांना सोबत घेऊन अनेक प्रकल्प तडीस नेण्याचा मानस असल्याचेही हॅमण्ड यांनी म्हटले आहे. भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांतील वित्तीय तंत्रज्ञान व वित्तीय सेवांमधील आदान-प्रदानात वाढ व्हावी, म्हणून ‘युके-भारत वित्तीय तंत्रज्ञान परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही देशांतील वित्तीय सेवांवर हॅमण्ड यांनी भाष्य केले. हॅमण्ड पुढे म्हणाले की, दोन्ही देशांनी घेतलेल्या पुढाकाराचा फायदा येथील वित्तीय तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यांचा विस्तार करण्यासाठी होणार आहे. त्यात ही परिषद म्हणजे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक मजबूत झाल्याचे प्रतिक आहे. युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडण्याच्या कारणांवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ब्रिटनच्या व्यापक धोरणाचा हा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, ब्रिटेन यापुढेही युरोपियन देशांचा जवळचा मित्र आणि भागीदार राहणार आहे. भारत आणि युकेची कायदेशीर यंत्रणा, तत्त्व, व्यापाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच असल्याने प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारतात सन २००० सालापासून अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक गुंतवणूक ही ब्रिटीश कंपन्यांनी केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. दोन दिवसीय भेटीत त्यांनी दिल्लीत अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबतही दोन्ही देशांतील वित्तीय सेवांबाबत विस्तृत चर्चा केली. त्यात दोन्ही देशांच्या सशक्त सेवांचा वापर देशांच्या उन्नतीसाठी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सध्या युकेच्या आंतरराष्ट्रीय बँकिंग समूहात १५ भारतीय बँकांचा मोलाचा वाटा आहे. आज एका बटणावर जगात कुठेही पैसे पाठवता येतात. वित्तीय सेवांमधील या क्रांतीमुळे ग्राहकांनाही त्याच्या पैशांचे नियोजन करणे सोयीचे ठरत आहे. मुंबई तर देशाच्या वित्तीय तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे हृदय आहे. त्यामुळेच २०१६ मध्ये देशाच्या वित्तीय सेवांमध्ये मुंबईचा वाटा हा एक तृतीयांश इतका होता. त्यामुळे या वाढत्या क्षेत्रामध्ये युके आणि भारत हे दोन्ही देश सशक्त मित्र म्हणून पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>फिलीप हॅमण्ड म्हणाले...भारतात २२ कोटी नागरिक स्मार्टफोनचा वापर करतात. हा आकडा युकेतील स्मार्टफोन वापरणाऱ्या नागरिकांच्या तिप्पटीहून अधिक आहे.भारतातील नोटबंदी म्हणजेच येथील वित्तीय सेवा क्षेत्राच्या परिवर्तनाची सुरुवात आहे. म्हणूनच देशात नवीन वित्तीय तंत्रज्ञान पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढतेय.
भारतीय वित्तीय तंत्रज्ञांना इंग्लंडचे द्वार खुले
By admin | Published: April 06, 2017 4:55 AM