- सचिन लुंगसेमुंबई : निसर्गातील जैवविविधता जपणे आणि टिपण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने अनोखा असा ‘ई-मॅमल’ प्रकल्प हाती घेतला आहे. भारतात पहिल्यांदाच हा प्रकल्प राबविला जात असून, त्याअंतर्गत वन्यप्राणी टिपत त्यांची माहिती संकलित करत, तिचे विश्लेषण केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थी मित्रांच्या मदतीने प्रकल्प राबविला जात असून, यासाठी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानपूरक ट्रॅप कॅमेरे, लॅपटॉप, प्रोजेक्टर, प्रिंटर इंटरनेट, दुर्बीण, बॅटरी, मेमरी काडर््स आदींसह माहितीपत्रिका प्रदान करण्यात आली आहे.ई-मॅमल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण (एसएनएम) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)च्या सहकार्याने, फेब्रुवारी २०१७ पासून पश्चिम घाट, कोकण क्षेत्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या ७ जिल्ह्यांतील २० शाळांमध्ये काम सुरू आहे. विद्यार्थी ५ ते १०चा गट तयार करून, कॅमेरे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात बसवतात आणि त्यामध्ये आलेले फोटो विद्यार्थी स्वत: ई-मॅमल वेबसाइटवर अपलोड करतात. या वेळी एसएनएमचे प्रकल्प अधिकारी प्रसाद गोंड, सागर रेडीज, अनिकेत देसाई आणि राजेंद्र हुमारे हे या प्रकल्पाचे परीक्षण करत आहेत.आतापर्यंत मागील वर्षभरात ट्रॅप कॅमेरे विद्यार्थ्यांद्वारे लावण्यात आले असून, त्यामध्ये आलेले फोटो ई-मॅमल वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत. ही एकप्रकारची शास्त्रीय माहिती असून, याचा उपयोग संशोधनासाठी केला जाऊ शकतो. ही सर्व माहिती संशोधनासाठी वापरली जाते. त्यामुळे अनेक संशोधकांचा बराच पैसा आणि वेळ वाचतो आहे. आतापर्यंत कॅमेºयामध्ये पट्टेरी वाघ, अस्वल, बिबट्या, तसेच दुर्मीळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे खवले मांजर, साळींदर आणि सहज आढळणारे भेकर, सांबर, रानडुक्कर, रानटी ससे, काळमांजर, मुंगूस व माकडे आदी वन्यप्राणी टिपले गेले आहेत.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)च्या सहकार्याने सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण (एसएनएम)ने एप्रिल २०१७ मध्ये ई-मॅमल प्रकल्पाची पहिली कार्यशाळा आयोजित केली. प्रकल्पासाठी आयसीआयसीआय बँकद्वारा निधी देण्यात आला असून, नॉर्थ कॅरोलिना नॅचरल सायन्सेसच्या संग्रहालयाद्वारे पाठिंबा मिळाला आहे. या प्रकल्पामुळे सात जिल्ह्यांतील २० शाळांमधून विद्यार्थी शिक्षकांना एकत्र करण्यात यश आले आहे.माहिती व्यवस्थापन प्रणालीहे एकप्रकारे सायबर टूल असून, कॅमेरा ट्रॅपिंग प्रतिमा आणि माहिती एकत्रित करणे, संग्रह करणे आणि सामायिक करणे, यासाठी ही एक वन्यजीवांबाबत माहिती व्यवस्थापन प्रणाली आहे. अद्वितीय असा हा प्रकल्प आहे, ज्यात निसर्ग संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्रकल्पात विद्यार्थ्यांचा सहभाग असून, ते त्यांच्या पर्यावरणाकडे विविध दृष्टीकोनातून पाहू शकतील; निसर्ग संवर्धनासाठी पुढे येतील, असे बीएनएचएसचे क्युरेटर आणि ई-मॅमल प्रकल्पाचे भारतीय समन्वयक राहुल खोत यांनी सांगितले.ई-मॅमल हा प्रकल्प १७ देशांत राबविण्यात येत आहे. हा भारतात पहिल्यांदाच राबवून वन्यजीवाबाबत माहीत मिळविण्याचे काम सुरू आहे.भारत हा जगातील आठ जैवविविधतापूर्ण स्थळांपैकी एक आहे आणि भारतातील सह्याद्रीचा भाग जैवविविधता संपन्न आहे.बीएनएचएसने २०१५ साली ई-मॅमल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात युनियन इंग्लिश स्कूल, आंबोली, सिंधुदुर्ग, जय सेवा आदर्श हायस्कूल, पवनी, नागपूर व एसजीएम भडांगे हायस्कूल, वाकी, पालघर या तीनही शाळांत हा प्रकल्प राबवत यशस्वीरीत्या पहिला टप्पा पूर्ण केला.
तंत्रज्ञानाने होतेय पर्यावरणाचे संवर्धन; ७ जिल्ह्यांतील २० शाळांमध्ये काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:45 AM