पुणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्यावतीने गुरुवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यादरम्यान हजारो अंगणवाडी ताईंनी अटक करुन घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या घोषणांनी आसमंत दणाणून गेल्याचे चित्र विविध ठिकाणी पहायला मिळाले.
पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी ५ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्यव्यापी जेलभरोचा भाग म्हणून स्वारगेट येथील जेधे चौक, हडपसर गाडीतळ, पुणे -मुंबई रोडवरील नाशिक फाटा चौक, जुना बाजार (शाहीर अमर शेख)चौक, कर्वे रोडवरील शिवाजी पुतळा येथे वाहतूक काही काळ अडवण्यात आली.
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ‘जेल भरो’आंदोलन करण्यात आले. दुपारी टाऊन हॉलपासून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारविरोधी जोरदार घोषणा देत अंगणवाडी ताईंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मारला. सांगलीतही जिल्हा परिषदेसमोर आंदोलन झाले. गांधीगिरीने सुरू असलेले हे आंदोलन लवकर क्रांतिसिंहांच्या चळवळीसारखे जहाल होईल, असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला. कºहाडातही निषेध मोर्चा निघाला. तहसील, प्रांत, पंचायत समिती तसेच एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प कार्यालयांपुढे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नगरमध्ये पोलीस हतबलअहमदनगरमध्ये स्वत: हून जेलमध्ये जाण्याच्या तयारीने आलेल्या साडेपाचशे अंगणवाडी सेविकांना अटक करण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शविली़ त्यानंतर सेविकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशव्दारासमोर दोन तास ठिय्या दिला़ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून आंदोलन स्थगित झाले.
खान्देशातही जेलभरोखान्देशातही विविध ठिकाणी आंदोलन झाले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले.आयटक व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे संघटनेचे अध्यक्ष कॉ.अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी महात्मा गांधी उद्यानापासून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
विदर्भातही आवाज घुमलानागपुरातील संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. येथे पोलिसांशी बाचाबाची झाल्यानंतर ३२२४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अमरावतीतील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले. शहर व जिल्ह्यातील सहाशे अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. गोंदिया, भंडाºयातही जेलभरो आंदोलन झाले. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तसेच गडचिरोली येथे मोर्चा काढण्यात आला.गेले २५ दिवस राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्या बंद आहेत. ५० लाखांवर लहानग्यांना पुरक आहार मिळाला नाही. मात्र, महिला बाल विकास मंत्री स्वस्थ तर मुख्यमंत्री परदेश वाºया करीत आहेत. संपकºयांशी चर्चाही करत नाहीत, हे संतापजनक आहे.- नितीन पवार. प्रदेश उपाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा