सेलू (जि. परभणी) : मराठा क्रांती मूक मोर्चाविषयक आक्षेपार्ह व्यंगचित्र ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध केल्याप्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा संपादक उद्धव ठाकरे यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सेलूच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत.यासंदर्भात अॅड. रामेश्वर शेवाळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २५ सप्टेंबर रोजी ‘दैनिक सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत मराठा क्रांती मूक मोर्चाच्या अनुषंगाने आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे या दैनिकाचे संपादक उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत व व्यंगचित्रकार श्रीनिवास देसाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार अॅड. शेवाळे यांनी एका अर्जाद्वारे सेलू पोलिसांकडे केली होती. परंतु, पोलिसांनी कारवाई केली नाही.त्यामुळे अॅड. शेवाळे यांनी २७ सप्टेंबर रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने गुरुवारी या तिघांविरुद्ध कलम १५६ (३) सीआरपीसीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश सेलू पोलिसांना दिले. याच व्यंगचित्रावरून परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात यापूर्वी अॅड. विष्णू नवले यांच्या फिर्यादीवरून उद्धव ठाकरे, संजय राऊत व श्रीनिवास देसाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. (वार्ताहर)
उद्धव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 5:31 AM