लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विक्रोळी येथील हनुमाननगर पार्कसाइट परिसरातील झोपु योजनेत विकासक ओमकार डेव्हलपर्सनी भ्रष्टाचार केल्याची बाब उघड झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी या घोटाळ्यातील रक्कम आणि चित्रफीतही लोकांसमोर आणली आहे. त्याची दखल घेत, तातडीने या प्रकल्पाला स्थगिती द्यावी आणि ओमकार डेव्हलपर्सला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व आमदार नसीम खान यांनी केली आहे. पार्कसाइट येथील झोपु योजनेत ओमकार डेव्हलपर्सकडून भ्रष्टाचार होत असून, रहिवाशांवर दडपशाही करण्यात येत आहे. त्या विरोधात स्थानिकांनी आंदोलन पुकारले आहे. नसीम खान यांनी रविवारी आंदोलकांची भेट घेऊन, त्यांना पाठिंबा जाहीर केला. नसीम खान यांनी याबाबत उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याशी बोलून स्थानिकांना त्रास न देण्याची विनंती केली. ही जागा म्हाडाची असून, रहिवाशांच्या संमतीशिवाय विकासकाला कशी काय दिली, असा सवाल करतानाच म्हाडा, एसआरए व विकासकांचा हा भ्रष्टाचारावर पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यामातून आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील १५ सोसायट्यांचे पदाधिकारी, २४०० घरे व १०००० च्या वर रहिवाशांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याची घोषणा खान यांनी केली.
‘ओमकार डेव्हलपर्सला काळ्या यादीत टाका’
By admin | Published: July 17, 2017 2:39 AM