मुंबई, दि. 2- आज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली जाते आहे. राज्यामध्येही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे. बकरी ईदच्या निमित्ताने नमाज अदा करण्यासाठी ठिकठिकाणी मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. तसंच ईदच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत. मुंबई, नाशिक, मालेगाव, सोलापूरमध्ये सकाळपासून नमाज अदा करण्यासाठी गर्दी झाली होती.
नाशिकच्या शहाजनी ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठी गर्दी केली. नाशिक शहर हिसामुद्दीन अश्रफी यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आलं. यावेळी इदगाह मैदानावर ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आली. तसंच सर्व दहशतवादी संघटनांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आल्या. दहशतवादाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. या मैदानावर असा निश्चय करा की आपण आपल्या जोडीदाराला कधीही तलाक देणार नाही, असं आवाहन यावेळी धर्मगुरूंनी केलं. तीन तलाक हे इस्लामला मान्य नाही, आयुष्यामध्ये कोणीही कोणाला तलाक देऊ नये. तलाक सारखं मोठं पाप करु नये, असंही यावेळी धर्मगुरू म्हणाले.
तर मालेगावमध्येही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळाला. शहरातील मुख्य ईदगाह येथे मौलाना इम्तियाज एकबाल यांच्या नेतृत्वाखाली आज सुमारे दहा हजारावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाज नंतर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी, मनपा उपायुक्त विलास गोसावी यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ईद-उल-अजाहची नमाज सकाळी लवकर होत असल्याने शहरातील मशिदीत सकाळी सातपासून नमाजला सुरुवात झाली होती. मुख्य ईदगाह येथे साडेआठ वाजता नमाजला सुरुवात झाली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छाआज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुस्लिमांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईदच्या शुभेच्छा, आपल्या समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सुसंवादाची भावना वाढत राहो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.