मुंबई : दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनानिमित्त व्यावसायिकांसह घरोघरी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात रविवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्यात आली. दुचाकी-चारचाकी वाहने, फ्रिज, वॉशिंग मशीनसारख्या घरगुती वापराच्या नवीन वस्तूंच्या खरेदीसाठीही मुंबईकरांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला. लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या हिशेबाच्या वह्या, तिजोरी, चोपड्या आदींचे विधिवत पूजन केले. व्यावसायिकांकडून शोरूम्स व पेढ्यांसमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांबरोबरच दिव्यांच्या झगमगाटाने बाजारपेठा उजळून निघाल्या होत्या. लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत रविवारी खरेदीदारांच्या अमाप उत्साहामुळे सराफ बाजारातही गर्दी दिसून आली. ग्राहकांची पसंती सोन्याबरोबरच चांदीच्या नाण्यांनाही मोठ्या प्रमाणात होती. शहरातील अनेक सराफी पेढ्यांनी खरेदीवर आकर्षक बक्षिसे जाहीर केल्याने सोने खरेदीसाठी मोठा उत्साह होता. विशेष मुहूर्त साधत व्यापाऱ्यांनी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केले. पूजेनंतर अनेक व्यावसायिकांकडून फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली. लक्ष्मीपूजन दिवशी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे पूजन होताना दिसले. फ्रिज, वॉशिंग मशीन, कपाट अशा वस्तू खरेदीसाठीही मुंबईकरांनी हा मुहूर्त साधला. (प्रतिनिधी)
मुंबापुरीत लक्ष्मीपूजनाचा उत्साह, खरेदीची धूम
By admin | Published: October 31, 2016 5:34 AM