ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - शेतकरी हा प्रथमच एकवटला असून शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने बाजारभावाची हमी, शेतक-यांना पत्नीसह निवृत्ती वेतन कायदा करुन ते देणे आणि शेती उत्पन्नतील जोखमीचे व्यवस्थापन इर्मा कायदा करणे या मागण्या मान्य होईपर्यंत शेतक-यांचा संप सुरुच राहणार असल्याचे शेतकरी आंदोलनाच्या सुकाणु समितीचे सदस्य आणि कृषीतज्ञ डॉ़. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले़ शेतक-यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास शहरी, ग्रामीण अशी यादवी निर्माण होण्याची भिती असल्याचा इशारा त्यांनी दिला़.
शेतक-यांच्या संपाविषयी बोलताना डॉ़. मुळीक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभुधारक शेतक-यांना कर्जमाफी व दुध दराच्या वाढीबाबत घोषणा केली आहे़ मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा न करता तसा अध्यादेश काढावा़ दुधाच्या उत्पादनासाठी किती खर्च येतो, याची सर्वांना माहिती आहे़ एका लिटरसाठी ४० ते ४५ रुपये खर्च येतो़ सध्या त्याला १८ ते २५ रुपये मिळतात, त्यामुळे मुख्यमंत्री कशाची वाट पहात आहेत़ शासनाने शेतक-यांमध्ये भेदाभेद करु नये, जेवढा मोठा शेतकरी तेवढे त्याच्यावरील कर्जही जास्त असते़ बँकांनी एनपीएची तरतुद केलेली असते़ शेतीसाठी त्याचा वापर का करीत नाहीत़.
आज राज्यात कांद्यापेक्षा रद्दीला जास्त भाव आहे़ शासनाने तातडीने आधारभूत किंमतीचा अध्यादेश काढावा़ राज्य शासनाने १९९६ मध्ये उच्च न्यायालयात शेतकरी १२ पिकांमध्ये ३२ ते ५० टक्के तोट्यात शेती करीत असल्याचे सांगितले होते़ कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, याची आम्हाला कल्पना आहे़ कोणत्याही कारणाने शेतकºयांचे नुकसान झाले तर ते भरुन देणे हे कायद्याने बंधनकारक करणारा इर्मा कायदा करण्याची आवश्यकता आहे़ शेतकरी आता इरेला पटला आहे़ शेतकºयांना मारहाण करण्याचा पोलिसांना काहीही अधिकार नाही़ हा संप दडपण्याचा प्रयत्न केला तर यादवी निर्माण होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली़.
भूमाता शेतकरी कर्जमुक्ती अभियान सुरु केले असून या शेतकºयांच्या संपाला खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा आहे़ लवकरच ते या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होतील, असे डॉ़ मुळीक यांनी सांगितले़.
पाहा व्हिडीओ-
https://www.dailymotion.com/video/x8451yf